लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव बाजार (अकोला) : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना या विषाणूजन्य आजाराने देशात शिरकाव केला असून, राज्यात या आजाराचे ४१ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या उपाययोजना केल्या जात असताना तेल्हारा तालुक्यातील वारखेड येथील ग्रामपंचायतनेही कंबर कसली आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले विशेषत: पुणे, मुंबई, नाशिक येथे असलेल्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतरच गावात प्रवेश करावा, असा ठरावच येथील ग्रामपंचायतने घेतला आहे.तेल्हारा तालुक्यातील वारखेड ग्रामपंचायतने ‘कोरोना’च्या पृष्ठभूमीवर संभाव्य धोके लक्षात घेऊन हा ठराव घेतला आहे. वारखेड येथील लोकसंख्या जवळपास १,३०० असून, गावातील १५ ते १७ युवक हे नोकरीसाठी बाहेरगावी (मुंबई, नाशिक व पुणे) येथे गेले आहेत. गावातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता, हा ठराव घेण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘कोरोना’ आजारामुळे मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला.पुणे येथेही या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात कोरोना व्हायरस या आजाराचा वेगाने प्रसार होत असल्याने, राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. या पृष्ठभूमीवर तेल्हारा तालुक्यातील वारखेड येथे सर्वानुमते ठराव मंजूर करीत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना तपासणीशिवाय गावात प्रवेश नसल्याचा ठराव घेण्यात आला. गावात स्वच्छता राखणे, गर्दी टाळणे, सर्दी, खोकला आणि ताप आल्यास तत्काळ उपचार करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. दरम्यान, बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा या गावातीलही अशा प्रकारचया तपासणीची मागणी समोर आली आहे. (वार्ताहर)
गावामध्ये ‘कोरोना’चा वाढता धोका लक्षात घेता फैलाव होऊ नये, म्हणून गावातील जनतेचा विचार करून असा ठराव घेतला आहे.-विलास वानखडे,सरपंच, वारखेड, ता. तेल्हारा.
राज्यात कोरोनाचा धसका घेतल्याने बाहेरगावातील युवक गावात परतत असून, त्यांच्यापासून गावात काही होऊ नये, म्हणून सदर ठराव मंजूर करण्यात आला.-अमोल तिखट,संचालक, बाजार समिती तेल्हारा.