लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : गत दीड महिन्यांपासून बोरगाव मंजू येथे आपल्या नातेवाइकांकडे मुक्कामी राहिलेला पाहुणा खामगाव येथे गेल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून हा पाहुणा मुक्कामी राहिलेल्या भागात सर्वेक्षण सुरू केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाने लॉकडाउन केले असून, संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे खामगाव येथील एक व्यक्ती बोरगाव मंजू येथील नातेवाइकांकडे दीड महिन्यांपासून मुक्कामी होता. दोन ते तीन दिवसांपूर्वी तो व्यक्ती खामगाव येथे गेल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्या व्यक्तीचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आल्याने बोरगावमंजू येथे खळबळ उडाली आहे. ज्या नातेवाइकांकडे ही व्यक्ती मुक्कामी होती त्यांनी कुटुंबासह शासकीय रुग्णालयात दाखल होऊन आरोग्य तपासणी करण्यासाठी धाव घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन संशयित भागात निर्जंतुकीकरण फवारणीसह उपाययोजना केल्या. आशा गटप्रर्वतक वर्षा ढोके, आशा स्वयंसेविका कविता देशमुख, दुर्गा सोनटक्के, उर्मिला उमाळे यांनी परिसरात सर्व्हे करून माहिती घेतली.