लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच खासगी दवाखान्यात तपासण्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची नोंद करून त्यातील संदिग्ध रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.अनेक लोक कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला साथ देत नसल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे खासगी दवाखाने व रुग्णालयांना रुग्णांची नोंद करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या रुग्णांपैकी ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत, त्या रुग्णांची यादी आरोग्य विभागाला दिली जाणार आहे. या रुग्णांचा पाठपुरावा करीत आरोग्य यंत्रणा त्यांची पुढील आरोग्य तपासणी करणार आहे. या माध्यमातून कोरोनाविरुद्धचा लढा आणखी प्रबळ होणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हूनच शासकीय रुग्णालयात संपर्क करून प्रशासनाला मदत करावी, असे आवाहनदेखील आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक नागरिकाने स्वत:हूनच शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, नियमांचे पालन केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. शिवाय, खासगी रुग्णालयांनादेखील रुग्णांची यादी करण्याबाबत सूचना दिल्या असून, संदिग्ध रुग्णांची माहिती मागविण्यात येत आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.
CoronaVirus : खासगी ‘ओपीडी’तील संदिग्ध रुग्णांवरही आरोग्य विभागाचे लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:10 AM