अकोला : विदेशातून आलेल्या नागरिकांना आरोग्य विभागातर्फे ‘होम क्वारंटीन’ ठेवले आहे; परंतु या नागरिकांकडून कुठल्याही सुरक्षा साधनांचा वापर होत नसून, ते सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या व्यक्तींमार्फत कोरोनाचा धोका पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.आरोग्य विभागानुसार, विदेशातून आलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग नसला तरी, काही दिवस त्यांनी वैद्यकीय निगराणीत राहणे गरजेचे आहे. म्हणूनच अशा व्यक्तींची नियमित वैद्यकीय चाचणी होत असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे. उपलब्ध सुविधा पाहता अशा नागरिकांना पुढील १४ दिवस त्यांच्या घरात राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. शिवाय, मास्क चाही उपयोग करण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु ‘होम क्वारंटीन’ केलेल्या व्यक्तींपैकी काही लोक कुठलीही सुरक्षा साधने न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याची माहिती समोर आली आहे; मात्र यामधील एखादा व्यक्ती कोरोनाचा पॉझिटिव्ह निघाल्यास त्याचा इतरांनाही धोका संभवू शकतो.
‘त्या’ दाम्पत्याचे नमुने पाठविणार नागपूरला‘होम क्वारंटीन’ असलेल्या एका दाम्पत्याची पुन्हा एकदा कोरोना तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून त्यांचे नमुने नागपूरला पाठविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभाग त्या दाम्पत्याची समजूत काढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे दाम्पत्य कुठल्याही सुरक्षा साधनांचा वापर न करता शहरात फिरत असल्याने आरोग्य विभागातर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे.