अकोला : संपूर्ण विदर्भात सर्वाधिक रुणसंख्या व सर्वाधिक मृत्यू यामुळे अकोला हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. रुग्णवाढीचा वेग पाहता प्रशासनाने महापालिकेच्या स्तरावर प्रतिबंधित क्षेत्रासाठी तर जिल्हा प्रशासनाने इतर क्षेत्रासाठी आरोग्य पथक नियुक्त केले असून, शहरातील प्रत्येक घरी जाऊन हे पथक नागरिकांची प्राथमिक तपासणी करत आहे.अकोला शहरात कोरोनाबाधितांची संख्या ही आता आठशेच्या वर गेली आहे, तर ३९ रुग्णांचा मृृत्यू झाला आहे. शहरात १७१ प्रतिबंधित क्षेत्र असून, यामधील २० हजार घरांचे सर्वेक्षण आरोग्य पथकाने पूर्ण केले आहे. तब्बल १ लाख ६९२ रुग्णांची तपासणी झाली असून, यामधील गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्यांची तातडीने चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली. दुसरीकडे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार ४२६ पथकांची नियुक्ती केली असून, ४ जूनपासून हे पथक घरोघरी जाऊन नागरिकांकडून प्राथमिक माहिती घेत आहे तसेच आॅक्सिमीटरद्वारे तपासणीही करत आहे.कोरोनाबाधित रुग्णाच्या अत्यंत निकट संपर्कात आलेले ‘हाय रिस्क’ तसेच अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या ‘लो रिस्क’मधील संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी या पथकांची मदत होत असून, त्यानुसार संबंधित नागरिकांना पुढील तपासणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे.