- राजेश शेगोकार
अकोला : आधीच आर्थिक मंदीचा सामना करत असलेले उद्योग व व्यापार क्षेत्र कारोना अन् लॉकडाउनमुळे धोक्यात आले आहे. कोरानाचा सामना करण्यासाठी सरकारने वेळीच घेतलेला लॉकडाउनचा हा निर्णय हा अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे; मात्र या लॉकडाउनचे मोठे परिणाम सर्वच क्षेत्रावर होणार असून, व्यापार व उद्योग क्षेत्राची आर्थिक घडीच विस्कटली जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात केंद्र व राज्य शासनापुढे या संकटातून या क्षेत्राला सावरण्याचे आव्हान आहे.लॉकडाउन सुरू असताना ग्रामीण भागासह शहरातील असंघटित कामगार, व्यापारी, कष्टकरी, मजूर वर्ग आता पुढे कसे होईल, या चिंतेने ग्रासलेले दिसत आहेत. अनेकांनी बँकांचे कर्ज घेतलेले आहे. त्याचे हप्ते भरण्याची अडचण होत आहे. दुसरीकडे या सर्वांना रोजगार पुरविणारे मोठे व्यापारीही संकटात आले आहेत. कष्टकरी, कामगार यांच्यासाठी शासनाने १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. त्यात रेशन मिळणार असले तरी इतर फायदे हे नोंदणीकृत मजूरवर्गासोबतच असंघटित कामगारांना मिळणे अपेक्षित होते. रेशन मिळाले तरी भाजीपाला, साखर-चहापत्ती, तेल व वीज बिल, मोबाइल, घरभाडे आदी इतर घरखर्चासाठी रोख पैसा लागणार आहे. ही समस्या एकदम जीवनावश्यक नसली तरी याने दैनंदिन जीवन विस्कळीत होणार आहे.अकोल्यातील व्यापार क्षेत्रावर ३ हजार २२५ कोटीचे कर्जअकोल्याची व्यापार व उद्योग क्षेत्र हे पश्चिम वºहाडातील सर्वात मोठे उद्योग क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये लावण्यात आलेल्या भांडवलापोटी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केली आहे. एका अंदाजानुसार येथील उद्योग व्यापार क्षेत्रावर तब्बल ३ हजार २२५ कोटीचे कर्ज असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे क्षेत्रच ठप्प झाल्यामुळे या कर्जाची मुद्दल व व्याज उभारण्याचे मोठे आव्हान या क्षेत्रावर आहे.
दुकान भाड्यापोटी ७० कोटीचा खर्चशहर व जिल्हाभरातील व्यापारांची सर्वच दुकाने मालकीची नाहीत तसेच अतिक्रमणामध्ये लावण्यात येणारी दुकाने व हातगाड्या यांचीही अवैध भाडे वसुली सुरूच असते. अशा एकूण भाड्यापोटी तब्बल ६० ते ७० कोटीचा खर्च होत असतो.
हमाल, मजूरही बेरोजगारलॉकडाउनमुळे खासगी कर्मचारी, कामगार, हमाल हेसुद्धा अडचणीत आले आहेत. बाहेर जाता येत नाही अन् घरी बसून पोट भरत नाही अशा विचित्र अवस्थेत बेरोजगारीचे मोठे संकट त्यांच्यापुढे उभे आहे. अनेकांनी घर, दुचाकी, चारचाकी, व्यक्तिगत, व्यापारी कर्ज काढले असून, त्यांच्या हप्त्याचा भरणा कसा होणार, हाही मोठा प्रश्न आहे.
आधी सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, तरच इतर क्षेत्र राहतील. त्यामुळे या लॉकडाउनला सर्व व्यापार, उद्योग क्षेत्र सहकार्य करत आहे. हा लॉकडाउन जेव्हा संपेल तोपर्यंत हे क्षेत्र पूर्णत: कोलमडून जाईल. त्यासाठी अनेक अपेक्षा आहेत; मात्र तूर्तास बँकांच्या कर्जखात्यांना ‘एनपीए’च्या नियमातून किमान दोन महिने सवलत देणे गरजेचे आहे.- वसंत बाछुका, उद्योजक, अकोला