लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील दारू विक्री २५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री दिले. या कायद्याची अंमलबजावणी शनिवार, २१ मार्चपासून लागू होणार आहे.राज्यात सर्वत्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मद्य आणि मद्य सेवन करण्यासाठी नागरिक मद्य विक्री दुकान, बार, रेस्टॉरंट आदी ठिकाणी एकत्रित येतात. त्यामुळे संसर्गजन्य आजार उद््भवून कोरोना विषाणूचा प्रादुर्भावदेखील होऊ शकतो.हे टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात शनिवार सायंकाळी ६ वाजतापासून महाराष्ट्र दारू बंदी कायदा लागू केला आहे. हा कायदा २५ मार्चपर्यंत लागू असणार आहे. त्यानुसार, वाइन शॉपी, देशी-विदेशी दारू दुकाने, सर्व परमिट रूम (बार), बीअर शॉपी, क्लब, किरकोळ व ठोक विक्री बंद राहणार आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास दोषींवर भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५) याच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
CoronaVirus : अकोला जिल्ह्यात आजपासून दारू बंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:14 AM