- अतुल जयस्वाल
अकोला : जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाला पायबंद घालण्यासाठी शासनस्तरावर आखल्या जात असलेल्या विविध उपायोजनांचाच एक भाग म्हणून महावितरणकडून आता वीज ग्राहकांचे मिटर रिडींग घेणे व वीज बिल वितरीत करण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे. या कालावधीत ग्राहकांना सरासरी वीज देयक आकरण्यात येणार असून, संकेतस्थळावर देयक पाहण्याची सुविधा असणार आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सोमवार २३ मार्चपासून मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये. या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल आकारावे. या काळात वीज देयकांची छपाई करण्यात येणार नाही. तथापि महावितरणच्या संकेतस्थळावर विज देयक उपलब्ध करून देण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. सोबतच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकवर एसएमएस पाठविण्यात येणार आहेत.
आॅनलाईन सुविधांचा करा वापरपुढील आदेशापर्यंत ग्राहकांचे मीटर रिडींग होणार नाही. ग्राहकांना शक्य असल्यास त्यांनी महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल अॅपमधील ‘सेल्फ रिडींग’ सुविधेद्वारे मिटर रिडींग पाठवावे अन्यथा सरासरी वीज वापराचे देयक आकारले जाईल. तसेच छापील वीजदेयक वितरण शक्य नसल्यामुळे आपले वीजदेयक आॅनलाइन पाहावे आणि देयक भरण्यासाठी व इतर सेवांसाठी महावितरणच्या आॅनलाइन सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.सोशल डिस्टन्सींसाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या कालावधीत २४ तास वीज पुरवठा सुरु ठेवण्यासाठी महावितरण प्रयत्नशिल राहणार आहे. ग्राहकांनीही आॅनलाईन सुविधांचा वापर करून वीज देयक भरावे आणि महावितरणला सहकार्य करावे. - पवनकुमार कछोट, अधिक्षक अभियंता, अकोला.