अकोला: संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावर विविध निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असताना महापालिका प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत कमालीचे बेफिकीर असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. नाले, गटारांची साफसफाई करणाºया कर्मचाºयांसह घरोघरी जाऊन कचरा जमा करणारे घंटागाडी चालक व ट्रॅक्टवरील कर्मचाºयांना अद्यापपर्यंतही सुरक्षेसाठी मास्क, हातमोजे व सॅनिटायझरचे वाटपच केले नसल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर वारंवार आढावा घेऊन नागरिकांनी गर्दी टाळण्यासंदर्भात आवाहन करीत आहेत. या बैठकांमध्ये महापालिका आयुक्त संजय कापडणीस तसेच वैद्यकीय आरोग्य विभागातील जबाबदार अधिकारी उपस्थित राहत आहेत.एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात असतानाच दुसरीकडे शहराची दैनंदिन साफसफाई करणाºया महापालिकेतील सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक, सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा जमा करणाºया ट्रॅक्टरवरील सफाई कर्मचाºयांच्या आरोग्याकडे मनपा प्रशासनाने सपशेल पाठ फिरविल्याचे चित्र समोर आले आहे.
निधी प्राप्त, खर्च का नाही?संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती करणे, सफाई कर्मचारी, वैद्यकीय यंत्रणेतील कर्मचाºयांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क, हात मोजे, सॅनिटायझर यासह विविध सुरक्षा रक्षक साहित्याची खरेदी करणे, भित्तीपत्रके चिकटवणे, सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करणे, नागरिकांनी वापरलेले मास्क, हातमोजे यासह इतर साहित्य उघड्यावर न टाकता त्याकरिता कचरापेट्यांची व्यवस्था करण्यासह विविध उपाययोजनांसाठी राज्य शासनाने वैद्यकीय आरोग्य यंत्रणेसाठी एक कोटींचा निधी दिला आहे. प्राप्त निधीतून मनपा प्रशासनाने तातडीने नियोजन करणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याची माहिती आहे.
...तर आम्ही जीव धोक्यात का घालायचा?शहरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचे समाधान असले तरी संभाव्य धोका पाहता नाले, गटारे यांची दैनंदिन साफसफाई करणाºया मनपा कर्मचाºयांच्या जीवाला धोका असल्याचे कोणीही नाकारत नाही. घरोघरी जाऊन कचरा जमा करणारे घंटागाडी चालकांच्या आरोग्याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात नसेल, तर आम्ही जीव धोक्यात घालून साफसफाई का करायची, असा सवाल मनपा सफाई कर्मचारी संघटनेकडून उपस्थित केला जात आहे.
मनपाच्या आस्थापनेवरील तसेच पडीत प्रभागातील खासगी सफाई कर्मचाºयांसह घंटागाडी चालक, ट्रॅक्टवरील कर्मचाºयांना तातडीने रुमाल, हातमोजे, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासनासोबत चर्चा केली आहे. तसेच वैद्यकीय आरोग्य यंत्रणेच्या कामावरही लक्ष दिले जात आहे.-विजय अग्रवाल, माजी महापौर तथा नगरसेवक.