अकोला : अकोला शहरात दररोज वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब असल्याचे सांगत, जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएसी) कोरोना रुग्णांसाठी १२० खाटांचा नवीन वॉर्ड शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘जीएमसी’मध्ये नवीन सुरू करण्यात येणाऱ्या १२० खाटांच्या वॉर्डमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना भरती करणे व त्यांच्यावर उपचार करण्याचे काम करण्यात येणार आहे. अकोला शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजनांचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक संबंधित क्षेत्रातून बाहेर येणार नाहीत, यासाठी त्या क्षेत्रातील शिधापत्रिकाधारकांना घरपोच अन्नधान्य पोहोचविणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वैद्यकीय सेवा आदी प्रकारच्या सुविधा त्याच भागात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘अॅक्शन प्लॅन’मधील विविध उपाययोजनांची अंमलबजावणी प्रशासनामार्फत तातडीने करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण उपस्थित होते.प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी तपासणी; रात्रीच्या वेळी फिरते रुग्णालय!अकोला शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, त्यामध्ये प्रत्येक घरातील सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या एकत्रित तपासणीनंतर रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात रेडक्रॉस दवाखाना आणि रात्रीच्यावेळी फिरते रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.