अकोला : शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने अकोला शहरासह तालुका परिसरात क्लस्टर कंटेनमेंट प्लॅन लागू केला जात आहे. त्यानुसार तालुक्याच्या सीमांवर प्रवेशबंदी करणे तसेच शहरातील वाहतुकीवरही निर्बंध लावण्यासोबतच नागरिकांना सकाळ, संध्याकाळी मॉर्निंग वॉक करण्याला बंदी केल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी रविवारी रात्री दिला आहे.अकोला उपविभागात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळत आहेत. तसेच रविवारी शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांनी मनाई हुकूम आदेश दिला आहे. त्यानुसार २६ एप्रिलपासून ते पुढील आदेशापर्यंत तो लागू राहणार आहे. त्या आदेशात अकोला तालुक्याच्या सीमा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. तालुक्यात ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. क्लस्टर कंटेनमेंटसाठी हा अॅक्शन प्लॅन पोलिसांनी राबवावा, असेही आदेशात म्हटले आहे.त्यासाठी अकोला शहरात येणाºया सर्व रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामध्ये डाबकी रेल्वे गेट, बाळापूर नाका, शिवर बायपास, वाशिम बायपास, पाचमोरी अकोट रोड, आपातापा रोड, दमाणी हॉस्पिटल, गुडधी रेल्वे गेट, खरप रेल्वे गेट, खडकी बायपास, मलकापूर एमआयडीसी रेल्वे गेट, महाबीज प्रक्रिया केंद्र शिवणी, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नायगाव रोड येथून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सोबतच अकोला शहरातील विविध भागातही दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रवेश मनाई करण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याला सूटया आदेशातून जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. सोबतच या क्षेत्रातील शिधापत्रिकाधारकांनी दुकानदारांनी दुकानातूनच वाटप करावे, क्षेत्राबाहेरच्या लाभार्थींना छोट्या वाहनांतून घरपोच धान्य द्यावे, असेही बजावण्यात आले आहे.फिरायला जाण्यावरही बंदीविशेष म्हणजे, अकोला शहरात सकाळी व सायंकाळी फिरणाºया व्यक्तींनाही या आदेशाने बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे पालन महापालिका व पोलीस विभागाकडून केले जाणार आहे. त्याबाबतचा दैनंदिन अहवालही मागवण्यात आला आहे.