अकोला: अकोल्यात शुक्रवारपर्यंत ‘कोरोना’चा एकही बाधित नाही; परंतु शुक्रवारी संध्याकाळपर्यंत तीन नवे संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात दाखल झाले असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली.विदेशातून अकोल्यात आलेल्या नागरिकांची संख्या ६२ वर पोहोचली आहे. सतर्कता म्हणून या व्यक्तींना ‘होम क्वारंटीन’ ठेवण्यात आले. त्यातील १६ व्यक्तींनी होम क्वारंटीनचा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांना यातून मुक्त करण्यात आले आहे; परंतु हळूहळू संशयितांच्या संख्येत वाढ होऊलागली आहे. दोन दिवसांतच चार नवे संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात नव्याने दाखल झाल्याने अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा वाजत आहे. यातील एक संशयित रुग्ण गुरुवारी रात्री, तर तीन संशयित रुग्ण शुक्रवारी दाखल आहेत. त्यामुळे सध्यातरी जिल्ह्यात एकही कोरोनाचा ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण नाही; दरम्यान, संशयित रुग्णांच्या संदर्भात माहिती देण्यास जीएमसीकडून अधिकृतरित्या कोणीही बोलायला तयार नाही. मात्र, विश्वसनीय वैद्यकीय सुत्रांकडून चार संशयित उपचार घेत असल्याचे माहिती लोकमतला मिळाली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट देऊन याबाबत खातरजमा केली आहे.
एक अहवाल ‘निगेटिव्ह’!आयसोलेशन कक्षात गुरुवारी सायंकाळी दाखल कोरोनाच्या एक ा संशयित रुग्णाचा अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आला आहे. रुग्णाचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले होते. सदर रुग्णाला रुग्णाची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुट्टी दिली जाणार आहे.
नोंदणीनंतर रुग्ण काढतात पळ!विदेशातून येणाऱ्या नागरिकांसह पुणे, मुंबई नागपूर येथून येणाºया प्रवाशांचीही सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जात आहे. या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळल्यास डॉक्टर त्यांना आयसोलेशन वॉर्डात रेफर करतात; मात्र काही संशयित रुग्ण आयसोलेशन वॉर्डात न जाता तेथून पळ काढत असल्याचे वास्तव आहे.
अखेर ‘त्या’ तिघांची नावे जाहीर!केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून प्राप्त यादीनुसार, अकोला जिल्ह्यात विदेशातून एकूण ६२ प्रवासी दाखल झाले होते. त्यापैकी ५९ प्रवासी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत; परंतु उर्वरित तीन प्रवाशांनी अद्यापही जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला नसल्याने अखेर त्या तिघांची नावे शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये हुस्टन येथून आलेले पंकज जयपाल पटेल, इंडोनेशियातून आलेले शुभम तिवारी आणि शारजाह येथून आलेला रितेश नामक एक व्यक्ती आहे. या व्यक्तींना ओळखणारे किंवा त्यांच्या नातेवाइकांनी तत्काळ त्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.