अकोला: नियंत्रणात असलेली कोविड रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली असून, गुरुवारी त्यात आणखी ६६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड रुग्णांचा आकडा १००४२ वर पोहोचला असून, त्यापैकी ७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ॲक्टिव्ह रुग्णांची स्थिती अकोलेकरांची चिंता वाढविणारी असून, नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची वाढती संख्या आरोग्य विभागाची चिंता वाढवत आहे. गुरुवारी त्यात आणखी ६६ रुग्णांची भर पडली असून, यातील ५८ अहवाल आरटीपीसीआर, तर ८ अहवाल रॅपिड ॲन्टिजन चाचणीचे आहेत. दुसरीकडे ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गुरुवारी प्राप्त आरटीपीसीआरच्या ५८ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बिर्ला कॉलनी, कौलखेड, दुर्गा चौक, गोरक्षण रोड व आरोग्य नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित धाबा ता. बार्शीटाकळी, बार्शीटाकळी, एमआयडीसी फेस दोन, कृष्णार्पण कॉलनी, बोरगाव मंजू, गजानन पेठ, न्यू राधाकिशन प्लॉट, गायत्री नगर, डाबकी रोड, संतोष नगर, मलकापूर, आळशी प्लॉट, तापडिया नगर, शिवाजी कॉलनी, मूर्तिजापूर, हातगाव, ता. मूर्तिजापूर, गाडेगाव ता. मूर्तिजापूर, आदर्श कॉलनी, पारद ता. मूर्तिजापूर व गणेश नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, तसेच सायंकाळी प्राप्त अहवालामध्ये तेल्हारा येथील आठ, गोरक्षण रोड, मलकापूर, राम नगर येथील प्रत्येकी तीन, व्हीबीएच कॉलनी, नागर ता. बाळापूर व मेहरबानू कॉलेज येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रणपिसे नगर, सुधीर कॉलनी, अंजनगाव सूर्जी, हिंगणा रोड, लेडी हार्डिंग्ज येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १००४२ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ९०२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थित ७१४ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
मृतांचा आकडा ३०६ वर
वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडाही चिंताजनक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मध्यंतरी ऑक्टोबर महिन्यात मृत्यूदर नियंत्रणात आला होता; मात्र दिवाळीनंतर यामध्ये पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे.