अकोला : जिल्ह्यात सध्यातरी कोरोनाचा एकही बाधित नाही; पण परिस्थिती केव्हाही बदलू शकते. परिस्थितीशी लढण्यासाठी शहरात शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास ३हजार ५५० खाटा आणि १०० पेक्षा कमी व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यामुळे अकोलेकरांनी वेळीच सावध होऊन आवश्यक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.विदेशासह पुणे, मुंबई आणि नागपूर यासारख्या कोरोना प्रभावित शहरातून अकोल्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ९ संशयित रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ४४ पेक्षा जास्त व्यक्तींना ‘होम क्वारंटीन’मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी १५ दिवस अकोलेकरांसाठी महत्त्वाचे आहेत. परिस्थिती बिघडल्यास जिल्ह्यात वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडू शकते. सद्यस्थितीत शहरात सरकारी रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत केवळ ३ हजार ५३५० खाटा, तर १०० पेक्षा कमी व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. परिस्थिती बिघडल्यास उपलब्ध वैद्यकीय सुविधा अपुरी पडू शकते. अशा वेळी शाळा महाविद्यालय, मंगलकार्यालय यांचाही वापर होईल. त्यामुळे नागरीकांनी आतापासूनच सावधगिरी बाळगली प्रशासनाचे निर्देश तंतोतंत पाळले तर हा धोका टळू शकतो.
बेफिकिरी ठरू शकते घातक!जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाखांपेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत वैद्यकीय सुविधा आवश्यकतेपेक्षा कमी आहे. सध्यातरी परिस्थिती आटोक्यात आहे; परंतु आगामी १५ दिवसांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. असे असले, तरी ‘होम क्वारंटीन’मध्ये असेलेले नागरिक असो वा पुणे-मुंबई येथून आलेले नागरिक यांच्याकडून होणारी बेफिकिरी घातक ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास आरोग्य यंत्रणाही त्यावर नियंत्रण मिळविण्यास असमर्थ ठरू शकते.
अशी आहे शहराची स्थिती शासकीय रुग्णालय - १ खासगी रुग्णालगाय - २०० एकूण खाटा - ३,५५० व्हेंटिलेटर - १०० पेक्षा कमी