लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या येथील एका मध्यमवयीन पुरुषाच्या संपर्कात आलेल्या ६२ रुग्णांपैकी ४६ रुग्णांचे वैद्यकीय अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यामुळे मूर्तिजापूरकरांना दिलासा मिळाला आहे. मुख्याधिकारी, शहर ठाणेदार, कर्मचारी, इतरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.दरम्यान, आणखी १६ जणांचे अहवाल येणे बाकी असल्यामुळे थोडी चिंताही आहे.स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकाच्या संपर्कात असणाऱ्या ५७ पैकी ४७ जणांची हेंडजच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरमध्ये संस्था अलगीकरणात व्यवस्था करण्यात आली आहे, तर १४ जणांना ‘होम क्वारंटीन’ करण्यात आले आहे. एक जण आधीच दाखल आहे. अशा ६२ लोकांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील ४६ जणांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यात ४६ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले असल्याचे सांगितले. त्यात येथील दोन खासगी डॉक्टरांचा समावेश आहे.मृतकाच्या संपर्कात आलेल्यांपैकी मुख्याधिकारी, ठाणेदार व खासगी डॉक्टरसह १४ जण स्वत: तपासणीसाठी आल्यामुळे त्यांना ‘होम क्वारंटीन’ करण्यात आले. इतर ६९ लोकांना ‘होम क्वारंटीन’ होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यापैकी २२ लोकांनी आपली प्राथमिक तपासणी करून ते ‘होम क्वारंटीन’ झाले आहेत. सद्यस्थितीत ३६ जण ‘होम क्वारंटीन’ आहेत. घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याने इतर उर्वरित लोकही आपली तपासणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. (शहर प्रतिनिधी)
मूर्तिजापुरकरांना दिलासा : ६२ संदिग्धांपैकी ४६ ‘निगेटिव्ह’; १६ अहवालांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:27 AM