लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात शनिवारी वाशिम जिल्ह्यातील एक युवक कोरोनाचा संशयित म्हणून दाखल झाला होता. रविवारी सायंकाळी त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.आॅस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचा सामना बघायला गेलेला युवक भारतात परतल्यावर त्याच्या मूळ गावी आला होता. त्यानंतर तो आजारी पडला. विदेशातून आल्यानंतर प्रकृती बिघडल्याने युवकाने अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. त्याला शनिवारी सकाळीच आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते. येथे त्याच्यावर प्राथमिक उपचाराला सुरुवात करण्यात आली होती. शिवाय, वैद्यकीय तपासणीसाठी त्याचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले हाते. रविवारी सायंकाळी त्या रुग्णाच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. असे असले तरी त्या युवकावर आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.यापूर्वी ७ मार्च रोजी जर्मनीहून आलेल्या एका तरुणीचा वैद्यकीय अहवालदेखील कोरोना निगेटिव्ह आला होता. जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही; मात्र सतर्कता म्हणून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे आवाहनदेखील आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.
अन् ‘ती’ तपासणीपूर्वीच पळून गेलीविदेशातून आलेली एक युवती रविवारी दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात आली होती. डॉक्टरांनी त्या युवतीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली. कोरोनाच्या तपासणीसाठी नमुने घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तयारी केली; पण त्यापूर्वीच ती युवती तेथून निघून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेनंतर मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने युवतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. युवती तिच्या घरी असल्याचे समजताच वैद्यकीय पथकाने तिचे घर गाठले. युवतीची प्रकृती चांगली असली, तरी १४ दिवस स्वतंत्र तिला एका खोलीत राहण्याच्या सूचना मनपाच्या आरोग्य पथकाने दिल्याची माहिती डॉ. फारूख शेख यांनी दिली.