अकोला: कोरोनाबधित रुग्णाला उपचारानंतर कुठल्याही तपासणीशिवाय दहाव्या दिवशी थेट घरी सोडले जाते; मात्र त्यानंतर आरोग्य विभागामार्फत त्या रुग्णाची पुन्हा तपासणी होत नाही. त्यामुळे कोरोनाचा संभाव्य संसर्ग रोखण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित रुग्णांवर आहे. त्यासाठी रुग्णांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांची काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्याही पाचशेच्यावर गेली आहे. अशातच ‘आयसीएमआर’च्या नवीन नियमावलीनुसार, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची पुन्हा तपासणी न करता दहाव्या दिवशी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्याचे निर्देश आहेत. ज्या रुग्णांना काही लक्षणे असतील, त्यांना संस्थागत अलगीकरण कक्षात तर ज्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशा रुग्णांना ‘होम क्वारंटीन’ केले जाते; मात्र त्यानंतर आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचे त्या रुग्णांकडे दुर्लक्ष होते. परिणामी, या रुग्णांकडून समूह संक्रमणाचा सर्वाधिक धोका संभवू शकतो, अशा परिस्थितीत कोरोना या आजारातून पूर्णत: बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्य यंत्रणेने दिलेल्या नियमांचे पालन केल्यास संभाव्य धोका टाळणे शक्य होईल.-निष्काळजी ठरू शकते घातक!‘होम क्वारंटीन’ केलेल्या रुग्णांना १४ दिवस घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या जातात; मात्र अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करून इतरांमध्ये मिसळतात. रुग्णांची ही निष्काळजी त्यांच्या कुटुंबासह परिसरातील नागरिकांसाठी घातक ठरू शकते.-रुग्णांकडून घेतले जाते कलम १४४ पत्रसुटीनंतर रुग्णांनी ‘होम क्वारंटीन’च्या नियमांची अंमलबजावणी करावी, या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत त्यांच्याकडून कलम १४४ चे पत्र भरून घेतल्या जाते. त्यानुसार नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले जाते.रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला सुटी दिली जाते; परंतु त्याच्यामार्फत संसर्ग पसरू नये, यानुषंगाने रुग्णांना काही सूचना दिल्या जातात. तसेच त्यांच्याकडून कलम १४४ चे पत्र भरून घेतल्या जाते. शिवाय, आरोग्य सेतूमार्फत त्यांच्यावर लक्ष दिले जाते. तसेच आरोग्य विभागही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.