अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत नवजात शिशूंनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या शिशूंकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे माता कोरोना बाधित किंवा संदिग्ध असेल, तर बाळाला मातेपासूनच दूरच ठेवणे योग्य, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांकडून दिला जात आहे.जिल्ह्यात कोरोना संदिग्ध रुग्णांसह बाधितांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे समूह संक्रमणाचा धोकाही वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे; मात्र नवजात शिशूंच्या बाबतीत तसे करणे शक्य नाही. त्यामुळे नवजात शिशूंना जवळ घेताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तज्ज्ञांच्या मते एक वर्षापर्यंतच्या बाळामध्ये आजाराचे लक्षण दिसून येत नाहीत. त्यामुळे बाळापासूनही इतरांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत बाळाला या सारखा आजार होऊच देऊ नये यासाठी नवजात शिशूंकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे.शिशूंना आईचेच दूध द्या; पण...तज्ज्ञांच्या मते कोरोना संदिग्ध किंवा बाधित माता असेल, तरी त्या मातेचे दूध नवजात शिशूला देता येते; परंतु शिशूंना दूध देण्यापूर्वी मातेने आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करण्याची गरज आहे किंवा इतर नातेवाइकांच्या माध्यमातूनही मातेचे दूध बाळाला देणे शक्य आहे.असा करता येईल शिशूंचा बचाव
- माता कोरोना बाधित किंवा संदिग्ध असेल, तर शिशूला मातेपासून दूरच ठेवा.
- शिशूचे आरोग्य चांगले असेल, तर नातेवाइकांजवळ ठेवता येईल.
- कमी वजनाचे असेल, तर ‘एनआयसीयू’मध्येही शिशूला ठेवता येईल.
- कुटुंबीयांनी शिशूला वारंवार हात लावणे टाळा.
शिशूंमध्ये आजाराची लक्षणे लवकर दिसत नाहीतएक वर्षाखालील शिशूंना गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. अशा मुलांना कोरोनासारख्या आजाराची लागणे झाल्यास त्याची लक्षणे लवकर दिसत नाहीत. त्यामुळे शिशूंपासून संसर्ग पसरण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत नागरिकांनी योग्य खबरदारी घेत शिशूंकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.सध्या तरी नवजात शिशूंकडे पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. माता कोरोना बाधित किंवा संदिग्ध असेल, तरी शिशूला आईचे दूध द्यावे; पण हे करत असताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.- डॉ. विनीत वरठे, बालरोग तज्ज्ञ, जीएमसी, अकोला.