शिर्ला/पातूर : मेडशी येथील ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पातुरातील पंधरापैकी सात रुग्ण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ निघाल्याने तालुक्यासह अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने तातडीने हालचाली करीत ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण राहत असलेल्या पाच नगरांच्या सीमा ‘सील’ केल्या आहेत.पातुरातील १३ नागरिक एका धार्मिक कार्यक्रमासाठी बडनेरा येथे गेले होते. ते २८ मार्च रोजी पाचोरा परतले होते. त्यांच्यासोबत मेडशी येथील एक नागरिक ‘पॉझिटिव्ह’ निघाल्याने तातडीने स्थानिक प्रशासनाने १७ जणांना अकोला सर्वोपचार रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. यातील सात जणांचे नमुने ‘पॉझिटिव्ह’ आले. सहा जणांचे ‘निगेटिव्ह’ आले. उर्वरित तीन जणांचे अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे आहेत.उपविभागीय दंडाधिकारी बाळापूर रमेश पवार यांनी पातूर शहरासाठी आदेश निर्गमित करून इसमांना फिरण्यास मज्जाव केला आहे. पातूर शहरात येणाऱ्या अकोला, बाळापूर, वाशिम या सीमा ‘सील’ करण्यात आल्या आहेत. शहरातील पंधरा ठिकाणी कायमस्वरूपी लाकडी बॅरिकेड्स तर सहा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे तरी बॅरिकेड्स उभारले आहेत.
पातूर शहरातील तथा शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील मुजावरपुरा, मोमीनपुरा, काशीदपुरा, बादशहा नगर, गुलशन कॉलनी या नगरांमध्ये एकूण सात कोरोना रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळल्याने हा भाग १०० टक्के ‘सील’ करण्यात आला आहे. पातुरातील अत्यावश्यक सेवा म्हणून फक्त दवाखाने व मेडिकल या कामासाठी सूट असेल तसेच जीवनावश्यक वस्तंूचे ठोक किरकोळ व्यापारी यांनाच मर्यादित प्रमाणात प्रवेश राहील. याशिवाय कुठल्याही व्यक्तीला सदर क्षेत्रातून येण्यासाठी किंवा आत जाण्यासाठी परवानगी राहणार नाही. त्रिस्तरीय प्रतिबंधित क्षेत्राच्या अॅक्शन प्लॅननुसार शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मुख्याधिकारी नगर परिषद पातूर यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठादारांना परवाना निर्गमित करण्यात येणार आहे.
या भागाचा समावेशकाशीदपुरा, मोमीनपुरा, गुलशन कॉलनी, देशमुख नगर, गुजरी बाजार, शहाबाबू चौक, चिरा चौक, देवडी मैदान, आठवडी बाजार, गुरुवारपेठ, काजीपुरापेठ, बाळापूर वेस, सिदाजी वेटाळ, पोलीस स्टेशन ते बाळापूर रोडपर्यंत, शिक्षक कॉलनी, एपीएमसी एरिया, अकबर प्लॉट, कढोणे नगर, रवींद्र नगर, उमाळे नगर, समी प्लॉट या भागाचा समावेश आहे. प्रथम नियंत्रण रेषा ही मुजावरपुरा, मोमीनपुरा, काशीदपुरा, बादशहा नगर व गुलशन कॉलनी या ठिकाणी राहणार आहे.