लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे बहुतांश बाधित रुग्णांमध्ये कोरोना संदर्भातील एकही लक्षण आढळत नसल्याने समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे आता तरी नियमांचे पालन करा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे अकोलेकरांना करण्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोनाने विक्राळ रूप धारण केले आहे. संक्रमणाचा धोका वाढला आहे. काही रुग्णांमधील लक्षणे अगदी सौम्य दिसून येतात, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५७० वर पोहोचला आहे. यामध्ये बहुतांश तरुण रुग्ण आहेत. अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच आढळून आली नाहीत; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून किंवा बाधिताच्या संपर्कात आल्यावर अशांची तपासणी केली असता त्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात आणखीही सायलेंट कॅरिअर रुग्ण वावरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारातील रुग्णाने तपासणीच्या प्रक्रियेत येईपर्यंत अनेकांपर्यंत कोरोनाचे संक्रमण पोहोचविले असते. त्यामुळे कधी कोणत्या भागात रुग्ण आढळेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे गर्दीची ठिकाणे टाळून अद्यापही घरातच राहणे, हा कोरोनाला रोखण्याचा प्रभावी पर्याय असल्याचे डॉक्टर सांगतात. कोरोनातून बरे झालेल्या एका २४ वर्षीय डॉक्टरच्या माहितीनुसार, त्यांच्या कोविड वॉर्डात सुमारे २५ रुग्ण दाखल होते. त्यापैकी केवळ चार ते पाच रुग्णांमध्येच कोरोना संदर्भातील लक्षणे दिसत होती. इतरांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती.स्वयंशिस्त पाळण्याची गरज!कोरोनाचा धोका वाढत असला तरी, शहरात अनेक ठिकाणी नागरिक ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळत नसल्याचे वास्तव आहे. बँकांबाहेर केलेली गर्दी असो वा सकाळी भाजी बाजारात केलेली गर्दी असो, सर्वच ठिकाणी नागरिक शिस्त भंग करताना दिसून येतात. हा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज असून, स्वयंशिस्त पाळणे आवश्यक झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरणसर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णासोबत डॉक्टर व परिचारिकांचा संपर्क येतो; मात्र, यातील कोणता व्यक्ती कोरोनाबाधित आहे, याचा अंदाज लावणे कठीणच आहे. अशातच येथील डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा संसाधने मिळाली नसल्याने डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.आता तरी नागरिकांनी नियमांचे पालन करा, प्रशासन आपल्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडावी, अकोलेकरांची साथ मिळाल्यावरच कोरोनाच्या संकटातून बाहेर पडणे शक्य होईल.डॉ. राजकुमार चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.
शहरात कोरोना बाधित रुग्णांचे निकटवर्तीय किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाच कोरोनाची लागण होत होत असल्याचे मनपाच्या 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'च्या अहवाला अंती दिसून येत आहे. त्यामुळे तूर्तास तरी शहरात समूह संसर्गाचा धोका पसरल्याचे म्हणता येणार नाही.- संजय कापडणीस आयुक्त, मनपा