अकोला: मागील सहा महिन्यात दररोज सरासरी एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे; मात्र नोव्हेंबर महिन्यातील मागील १९ दिवसांत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या महिन्यात मृत्यूची सर्वात कमी नोंद झाली असली, तरी एकूण मृत्यूदर ३.२ टक्क्यांवर कायम आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा वेग गत दीड महिन्यात मंदावला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात रुग्णसंख्या वाढीवर बऱ्यापैकी नियंत्रण होते. शिवाय मृत्यूदरही कमी झाला होता. मागील १९ दिवसांत केवळ ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मागील सहा महिन्यातील हा सर्वात कमी मृत्यूचा आकडा असल्याने मोठा दिलासा मिळाला; मात्र एकूण रुग्णसंख्येचा विचार केल्यास मृत्यूदर अजूनही ३.२ टक्क्यांवर कायम आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून दररोज एकाचा बळी जात असल्याने चिंता वाढली आहे.
अशी आहे स्थिती
महिना - रुग्ण - मृत्यू
एप्रिल - २८ - ०३
मे - ५५३ - २९
जून - ९६९ - ४७
जुलै - १०८७ - ३४
ऑगस्ट - १४०० - ४७
सप्टेंबर - ३४६८ - ८४
ऑक्टोबर - ८९३ - ४५
नोव्हेंबर - ४६८ - ७ (१९ नोव्हेंबरपर्यंत)
-----------------------------
एकूण - ८८६६ - २८६
सर्वाधिक मृत्यू सप्टेंबरमध्ये
कोरोनाचा आतापर्यंत सर्वाधिक कहर सप्टेंबर महिन्यात दिसून आला. याच महिन्यात सर्वाधिक ३४६८ रुग्ण, तर ८४ मृत्यूची नोंद करण्यात आली होती; मात्र त्यानंतर रुग्णसंख्यावाढीवर काही प्रमाणात अंकुश लागला होता. मागील चार ते पाच दिवसांपासून रुग्णसंख्यावाढीला पुन्हा सुरुवात झाल्याने चिंता वाढली आहे.
प्रशासन स्तरावर आवश्यक सर्वच उपाय योजना केल्या जात आहेत; मात्र नागरिकांनीही त्यांची जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला.