लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिवाय, मृत्यूदरातही वाढ होत आहे. यावर मात करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्लाझ्मा थेरपीची मान्यता मिळाली असून, त्यासाठी ७० लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, मृत्यूदर वाढत आहे. अशा परिस्थितीत अतिगंभीर रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा विचार केला जात आहे. राज्यातील इतर शासकीय वैद्यकी महाविद्यालयातील रक्तपेढ्यांप्रमाणेच अकोला जीएमसीलाही प्लाझ्मा थेरपीला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी प्रशासनाने ७० लाखांचा निधी मंजूर केला असून, युनिटसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदीची प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्यास लवकरच अकोल्यातही कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करणे शक्य होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम यांनी दिली.
अशी आहे प्रक्रियाएका डोनरच्या रक्तातून प्लाझ्मा थेरपीद्वारे ४०० मिली प्लाझ्मा काढता येईल. २०० मिलीच्या दोन बॅग तयार होतील. गंभीर कोरोनाबाधित रुग्णांना ते देण्यात येईल. एका वेळेस २०० मिली प्लाझ्माची पहिली बॅग, तर २४ तासांनंतर दुसरी बॅग दिली जाईल. त्या रुग्णाच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतील. रुग्ण बरा होण्यास मदत होणार असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
हे करू शकतात प्लाझ्मा डोनेट
- कोविड-१९ आजाराविरुद्ध यशस्वी लढा देणारी व्यक्ती.
- कोरोना आजारातून पूर्ण बरा झाल्याच्या १४ दिवसानंतरच दाता रक्त देऊ शकतो.
- कोरोनाचे दोन अहवाल निगेटिव्ह आल्यावरच दाता रक्तदान करू शकतो.
- रक्तदात्याला ताप किंवा श्वसनाशी संबंधित विकार असू नये.