अकोला : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. भरउन्हात जीवाचा धोका पत्करून गावामध्ये माहिती गोळा करण्याचे काम आशा वर्करकडून सुरू आहे. त्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रसार वाढत असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अद्याप कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. हा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका यांनी जनजागृतीची धुरा समर्थपणे सांभाळल्यानेच हे शक्य झाले, असेही डॉ. आसोले यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या आजारावर अद्याप परिणामकारक औषध उपलब्ध झालेले नाही. त्यापासून बचाव करण्यासाठी केवळ जनजागृती हाच उपाय आहे. सोबतच वारंवार साबणाने हात धुणे, हॅण्ड सॅनिटायझर्सचा वापर करणे, तोंडाला मास्क लावणे, सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्यास तत्काळ आरोग्य संस्थेशी संपर्क साधणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण भागात आशा वर्कर सातत्याने गृहभेटी देत जनजागृती करीत आहेत. आरोग्यविषयक सल्लाही देत आहेत, त्या सल्ल्याचे पालन करणेही गरजेचे आहे, असेही डॉ. आसोले यांनी सांगितले. अद्यापही आजाराचा धोका कमी झालेला नाही. या आजाराचा गत चार दिवसांत एकही रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ नाही. ही समाधानाची बाब आहे. जनतेने गत महिनाभरापासून विनाकारण घराबाहेर न पडता घरीच राहणे पसंत केले. त्यामुळेच या आजाराला प्रतिबंध होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत २०,५३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापुढेही सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन डॉ. आसोले यांनी केले आहे.