अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कोरोनाबाधित कैदी रुग्णांसाठी कारागृहात कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘कोविड केअर सेंटर’मार्फत २७ जूनपर्यंत कारागृहातील ३५० कैद्यांच्या घशातील स्रावाचे (थ्रोट स्वॅब) नमुने घेण्यात आले असून, कैद्यांची आरोग्य तपासणी करून उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी रविवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.जिल्हा कारागृहातील ६८ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याच्या पृष्ठभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी २८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणा व जिल्हा कारागृहातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हा कारागृहातील एका इमारतीमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित कैदी रुग्ण आणि ‘थ्रोट स्वॅब’ नमुने घेण्यात आलेल्या कैद्यांची वेगवेगळी व्यवस्था करून, कैद्यांची दैनंदिन आरोग्य तपासणी व उपचार सुरू करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले. या बैठकीला अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम यांच्यासह जिल्हा कारागृहाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.