अकोला : अकोल्यात बस्तान मांडलेल्या कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व संक्रमित होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, १० मे रोजी आणखी दोन कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने या आजाराला बळी पडणाºयांची संख्या ४२ झाली आहे. तर आणखी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ८८४ झाला आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत २६५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने संक्रमित रुग्ण समोर येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात १३६ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी प्राप्त २६ अहवाल निगेटिव्ह होते. आज सायंकाळच्या अहवालात २० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात १० महिला व १० पुरुष रुग्ण आहेत. त्यातील ११ जण हे इंदिरानगर वाडेगाव येथील रहिवासी आहेत. तर उर्वरित सावकारनगर आपातापा रोड, कौलखेड हिंगणाफाटा, देशपांडे प्लॉट, वाठुरकरनगर- मंगरुळपीर रोड, सिंदखेड ता. बार्शीटाकळी, देवी पोलीस लाईन, विजय नगर, जुने शहर व हांडे प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
आणखी दोघे उपचारादरम्यान दगावलेदरम्यान, सकाळी गाडगेनगर- हरीहरपेठ भागातील एका ६२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर व्यक्तीला ६ जून रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुपारी पुन्हा एका ७० वर्षीयरुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदर रुग्ण सोनटक्के प्लॉट, जुने शहर भागातील रहिवासी असून, त्याला २९ मे रोजी दाखल करण्यात आले होते.
आणखी ३२ जणांना डिस्चार्जएकीकडे कोरोनाची बाधा होणाºयांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे या संसर्गजन्य आजारावर मात करणाºयांचा आकडाही वाढत आहे. बुधवारी दिवसभरात ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सकाळी १४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यापैकी नऊ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. त्यात नऊ महिला तर पाच पुरुष आहेत. त्यातील तिघे सिव्हिल लाईन येथील, तिघे हरिहरपेठ येथील, दोघे अकोट फैल येथील तर उर्वरित हिंगणारोड, आंबेडकर नगर, गुरुनानक नगर, गायत्री नगर, सिटी कोतवाली व माळीपूरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दुपारनंतर आणखी १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील १४ जणांना घरी तर उर्वरित चौघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात सहा महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील तिघे गायत्री नगर येथील, तिघे खदान येथील, दोन जण काला चबुतरा येथिल तर उर्वरित कौलखेड, रामदास पेठ, जुनेशहर, मुजफ्फर नगर, संताजीनगर, बेलोदे लेआऊट, भरत नगर, खडकी, सिटी कोतवाली व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.आतापर्यंत ५७७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्या २६५ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.