अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवार, २८ डिसेंबर रोजी अकोला शहर व पातूर येथील प्रत्येकी एक अशा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३१८ झाली आहे. दरम्यान, आणखी १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १०,३९० वर पोहोचला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी ९२ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मोठी उमरी येथील तीन, हिवरखेड येथील दोन, विठ्ठल नगर येथील दोन, कौलखेड, डिएसपी ऑफिस जवळ, तोष्णीवाल लेआऊट, जिल्हा न्यायालय क्वार्टर्स, रामदास पेठ, दुर्गाचौक व व्याळा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
अकोला व पातूर येथील दोघांचा मृत्यू
सोमवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. पातूर येथील एका ९२ वर्षीय पुरुष रुग्णाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना २२ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. तर डाबकी रोड परिसरातील वानखडे नगर येथील ८१ वर्षीय पुरुष रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना २३ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
५३८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,३९० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,५३४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३१८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५३८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.