अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्ह्यात तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असतानाही या संसर्गजन्य आजाराचा हैदोस सुरुच असून, दिवसेंदिवस या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवार, २० जुलै रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. तर आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०५ झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या २,१४० वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी सकाळी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे १९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून, हे रुग्ण अकोल्यातील जुने शहर, केशव नगर, जेल क्वॉर्टर, खेतान नगर व जीएमसी येथील आहेत. दरम्यान, रविवारी रात्री रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये आणखी एक जण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.अकोला शहरातील दोघांचा मृत्यूरविवारी रात्री अकोला शहरातील दोन पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी एक ६० वर्षीय पुरुष गुलजार पुरा भागातील असून, दुसरा ६६ वर्षीय पुरुष लक्ष्मीनगर भागातील आहे. या दोघांनाही ११ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.३०६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१४० असून, यापैकी १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १७२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३०६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.