लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमधील अस्वच्छता आणि सुविधांचा अभाव आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप येथे दाखल संदिग्ध रुग्णांकडून केला जात आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तसेच कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांसाठी पीकेव्ही परिसरात कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रशासनाने संदिग्ध रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना दोन वेळचे जेवण तसेच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली आहे; मात्र स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथे दाखल संदिग्ध रुग्णांकडून केला जात आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.शिवाय, शौचालयांची दुरवस्था झाली असून, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अशा अनहायजेनिक परिस्थितीत महिलांच्या आरोग्यास सर्वाधिक धोका आहे. स्वच्छतेसोबतच तेथे आवश्यक सुविधांचाही अभाव असल्याने संदिग्ध रुग्णांची डोकेदुखी वाढली आहे. तापमान वाढत असताना या ठिकाणी रुग्णांना गर्मीतच राहावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात संदिग्ध रुग्णांकडून प्रशासनाला सांगण्यात आले; मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव आहे.अन्नाची नासाडीकोविड केअर सेंटरमध्ये प्रशासनातर्फे रुग्णांना जेवणाची व्यवस्था केली आहे; मात्र अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे जेवण जात नाही. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत असल्याचे वास्तव आहे.या सुविधांचा आहे अभाव!महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय नाही.मास्क दिले जात नाहीत.इमारतीच्या आत डस्टबिनसुद्धा नाही, तर डिस्पोजल युनिटही नाही.तापमान वाढले तरीही कुलरची व्यवस्था नाही.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील येथील कोविड केअर सेंटरमध्ये प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्याकडून नियमित स्वच्छता केली जाते. रुग्णांनी स्वच्छता ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.