अकोला : कोरोनाचा कहर सुरुच असून, पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, २४ मे रोजी नऊ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३८७ वर गेला आहे. दरम्यान, शनिवारी रात्री एका ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतकांचा आकडाही २४ झाला आहे. आतापर्यंत कोरोनापासून मुक्त असलेल्या तेल्हारा तालुक्यातही पाच रुग्ण सापडल्याने संपूर्ण जिल्हाचा कोरोनाच्या कक्षेत आला आहे.विदर्भात नागपूरनंतर अकोला शहर कोरोनाचा हॉटस्पाट ठरला आहे. मे महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, शनिवारपर्यत ३७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह होते. रविवारी यामध्ये आणखी नऊ जणांची भर पडत एकूण आकडा ३८७ झाला आहे. रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून १६९ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६० अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ९ जणांमध्ये चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. यापैकी पाच जण हे तेल्हारा शहर व तालुक्यातील आहेत. तर उर्वरित चौघे हे अकोला शहरातील राऊतवाडी, राजीव गांधी नगर, साईनगर डाबकी रोड, श्रावगी प्लॉट या भागातील आहेत. शनिवारी रात्री माळीपूरा भागातील एका ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेला २० मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या मृत्यूमुळे कोरोनाच्या बळींची संख्या २४ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत १३४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.आणखी दहा जणांना डिस्चार्जकाल रात्री दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये सर्व पुरुष आहेत. या सगळ्यांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात दोघे फिरदौस कॉलनी येथील तर अन्य आळशी प्लॉट, अकोट फैल, खैर मोहम्मद प्लॉट, नानक नगर, इमानदार प्लॉट, समता नगर, मोमीनपुरा, रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत.प्राप्त अहवाल-१६९पॉझिटीव्ह-नऊनिगेटीव्ह-१६०आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-३८७मयत-२४(२३+१),डिस्चार्ज-२२९दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३४