अकोला: प्रभागातील नाल्यांची साफसफाई झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत नगरसेविका राजेश्वरी शर्मा यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या कार्यालयात कचरा फेकण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न प्रशासनाने उधळून लावला. कंत्राटदारांच्या खाबुगिरीला वेसण घालण्यासाठी यंदा प्रथमच महापालिका प्रशासनाच्या स्तरावर मॉन्सूनपूर्व नाले सफाई करण्यात आली. ही जबाबदारी क्षेत्रीय अधिकार्यांवर सोपवण्यात आली. प्रभागातील नाल्यांची साफसफाई पूर्णत: केली नसून नाल्यांच्या काठावर माती व घाणीचे ढीग तसेच पडून असण्यावर नगरसेविका राजेश्वरी शर्मा यांनी आक्षेप घेतला. प्रशासकीय अधिकारी समस्या जाणून घेत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत नगरसेविका शर्मा यांनी हातात कचर्याची बादली घेऊन मंगळवारी मनपात प्रवेश केला. मनपा आयुक्तांच्या दालनात कचरा फेकण्यासाठी नगरसेविका शर्मा जात असतानाच आयुक्त लहाने यांनी दालनाबाहेर येऊन त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच हा कचरा मनपात कोठेही न फेकण्याची सूचना केली. तसेच उपायुक्त समाधान सोळंके यांना प्रभागात जाऊन नाल्यांची पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नगरसेविका शर्मा यांना कचरा फेकण्याची संधीच मिळाली नाही.
नगरसेविकेचे आंदोलन ‘टाय-टाय फिस्स’
By admin | Published: July 20, 2016 1:33 AM