अकोला: पालकमंत्री ना.कडू यांनी मनपाचे उपायुक्त वैभव आवारे यांना कंटेनमेन्ट झोनच्या व्यतिरिक्त भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था होत असेल तर परवानगी देण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्र्यांच्या शब्दाचा सोयीचा अर्थ काढत बुधवारी सकाळी जनता भाजी बाजारातील भाजीपाला विक्रीची दुकाने उघडण्यात आली. याची माहिती समजताच मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने भाजी विक्रेत्यांना दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले असता, काही व्यावसायिकांनी पोलिसांच्या उपस्थितीत मनपाच्या पथकाला दमदाटी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मनपाच्या बाजार विभागाकडून पोलिसात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.महापालिका प्रशासनाने कंटेनमेन्ट झोन वगळून सम-विषमच्या निकषाप्रमाणे शहरात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासह इतरही ठराविक व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिली. त्यानुसार ६ जूनपासून शहरातील बाजारपेठ थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु उघडण्यास सुरुवात झाली आहे. सम-विषमच्या निकषानुसार सुरुवातीला मुख्य बाजारपेठेत व्यावसायिकांमध्ये गोंधळ व संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. यासंदर्भात महापालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने व्यावसायिकांना सूचना व निर्देश दिल्यानंतर ही परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली. शहरातील कंटेनमेन्ट झोनमध्ये किराणा, औषध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याव्यतिरिक्त इतर कोणताही व्यवसाय सुरू करण्याची परवानगी नाही. केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणूची साखळी खंडित व्हावी, या उद्देशातून २३ मार्चपासून टाळेबंदी लागू केली. या कालावधीत विविध प्रकारचे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले असून, हाताला काम नसल्यामुळे गरिबांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने ६ जूनपासून कंटेनमेन्ट झोन वगळता निकषानुसार काही ठराविक व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिल्यानंतर शहरातील जनता भाजी बाजारात भाजी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी मंगळवारी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांना दुकाने सुरू करण्यासंदर्भात निवेदन सादर केले होते. त्यावेळी ना.कडू यांनी पर्यायी जागेची व्यवस्था करून परवानगी देण्याबाबत सुतोवाच केले होते. त्याचा अर्थ काढून बुधवारी बाजार भरविण्यात आला होता.जुना भाजी बाजारही उघडला!जनता भाजी बाजारातील काही भाजी विक्रेता संघटनांच्या इशाºयावरून जैन मंदिर परिसरातील जुना भाजी बाजारही उघडण्यात आल्याचे चित्र बुधवारी पहावयास मिळाले. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता भाजी खरेदीसाठी अकोलेकरांनी चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आले.
जनता भाजी बाजार उघडताच मनपाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 5:33 PM