अकोला : शहरात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आता रुग्णालयातून सुटी घेतलेला पॉझिटिव्ह रुग्ण व त्याच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील नागरिकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा महापालिकेवर सोपविण्यात आली आहे.सद्यस्थितीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल ८६४ झाली असून, यामुळे महापालिकेला कंटेनमेन्ट झोन वाढवावे लागत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. महापालिकेची होत असलेली दमछाक लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी मध्यंतरी शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आणण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे सोपवली होती. त्यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे तसेच भूमिअभिलेख विभागातील उपअधीक्षक योगेश कुलकर्णी यांच्यावर रुग्णांना आणून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी निश्चित करण्याचा आदेश जारी केला होता. यामुळे मनपाचे क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, कर वसुली लिपिक तसेच शिक्षकांना काही अंशी दिलासा मिळाला होता. यादरम्यान, जिल्हा प्रशासनाने रुग्णालयातून सुटी घेतलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या निकटवर्तीयांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा महापालिकेवर निश्चित केली आहे.‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर; रुग्णसंख्येत वाढरुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच संबंधित रुग्णाला शोधणे, त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल करणे तसेच तातडीने संबंधित भाग कंटेनमेन्ट झोन करण्यासाठी मनपाची यंत्रणा कार्यरत आहे. संबंधित भागाचे सर्वेक्षण करून नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी मनपा शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. यामध्ये कोरोना बाधित रुग्णाचे निकटवर्तीय तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मनपाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आल्यामुळेच रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे.मनपा बुचकळ्यात; ‘वॉच’ कसा ठेवणार?कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घरी आल्यानंतर त्याला किमान १४ दिवस होम क्वारंटीन राहावे लागते. यादरम्यान, सदर रुग्ण कोणा-कोणाला भेटला, कुठे बाहेर फिरायला गेला का, त्याच्या संपर्कात नेमके कोण आले, यावर नेमके कसे लक्ष ठेवायचे, या विचारातून मनपाचे क्षेत्रीय अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह व ‘हाय रिस्क’ रुग्णांवर मनपा ठेवणार ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:31 AM