मनपात साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अकाेला : काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत मनपाकडून अकाेलेकरांना साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सातत्याने आवाहन केले जात असतानाच, खुद्द मनपाच्या विविध कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून साेशल डिस्टन्सिंगला खाे दिल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले.
वस्तूंची कृत्रिम टंचाई
अकोला : कोरोनामुळे अनेक वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अनेक विक्रेते या वस्तूंची अव्वाच्या सव्वा दराने विक्री करीत आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
---------------------------------------------
अनुदान वाढविण्याची मागणी
अकोला : ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे. कृषी यांत्रिकीकरणाअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते. यासाठी कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टल तयार केले आहे.
-----------------------------------------------
काबुली हरभऱ्याला नऊ हजार रुपये दर
अकोला : बाजार समितीत काबुली हरभऱ्याची आवक सुरू आहे. मंगळवारी बाजार समितीत १३ क्विंटल आवक झाली असून, सरासरी आठ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. काबुली हरभऱ्याला कमीत कमी सात हजार ८०० व जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
-----------------------------------------------------
वन्यजिवांकडून पिकांची नासाडी
अकोला : जंगलाला लागून असलेल्या शेतातील पिकांची वन्यजिवांकडून नासाडी केली जात आहे. टरबूज, उन्हाळी मूग, तीळ ही पिके उद्ध्वस्त केली जात आहे. रोही, रानडुक्कर या वन्यजिवांनी शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. आधीच विविध कारणांमुळे हवालदिल झालेला शेतकरी या नव्या संकटामुळे चिंतेत सापडला आहे.
-------------------------------------------------
ग्रामीण अर्थचक्र कोलमडले!
अकोला : गेल्यावर्षी कोरोनामुळे कोलमडलेला अर्थचक्राचा गाडा निदान यंदा तरी सुरळीत होईल असे वाटत असताना पुन्हा गेल्या वर्षीपेक्षाही भयाण परिस्थिती निर्माण झाल्याने सलग दुसऱ्या वर्षीही ग्रामीण अर्थचक्राची गाडी निराशेच्या गर्तेत अडकली असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याच्या मार्गावर आहे.
-------------------------------------------------
मास्क विक्री बनले उदरनिर्वाहाचे साधन
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मास्क लावणे अनिवार्य झाले आहे. हेच मास्क अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. शहरात ठिकठिकाणी मास्क विक्री होत आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई होत असल्याने मास्कची विक्री वाढली आहे.
------------------------------------------------
शीतपेयांची विक्री ठप्प
अकोला : जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. यामध्ये शीतपेयांची विक्रीही ठप्प झाली आहे. उकाडा वाढत असला तरी कोरोनामुळे शीतपेये, आइस्क्रीम नागरिक टाळत आहे. व्यवसायावर परिणाम झाल्याने विक्रेतेही धास्तावले आहे.