अकोला : शहरातील मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वसामान्यांचा जीव धाेक्यात सापडला हाेता. वाहनांच्या मागे धावणाऱ्या श्वानांमुळे नागरिक जेरीस आले हाेते. तसेच पिसाळलेल्या श्वानांनी चावा घेतल्यामुळे अकाेलेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. एकूणच परिस्थिती लक्षात घेता मनपा प्रशासनाने भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व रॅबिज लसीकरणाचा निर्णय घेत मंगळवारपासून प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
रस्त्यांवर झुंडीने ठिय्या मांडणाऱ्या माेकाट श्वानांमुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. त्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाकडून उपाययाेजना केल्या जात असल्या तरी त्या प्रभावी ठरत नसल्याने भटक्या श्वानांची समस्या कायम आहे. २०१६ मध्ये मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी सर्वप्रथम माेकाट श्वानांच्या निर्बीजीकरणाचा निर्णय घेतला हाेता. त्यासाठी पशुवैद्यकीय मत्स्य व विज्ञान पदव्युत्तर संस्थेसाेबत करार करण्यात आला हाेता. याठिकाणी दरराेज चार माेकाट श्वानांचे निर्बीजीकरण केले जात हाेते. दरम्यान, आयुक्त निमा अराेरा यांनी श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाेबतच त्यांना रॅबिज लस देण्याच्या अनुषंगाने निविदा प्रसिध्द केली. यामध्ये सोसायटी फॉर ॲ्रनिमल प्रोटेक्शन (सॅप) कोल्हापूर, कम्पेशन फॉर ॲनिमल्स ॲण्ड प्रोटेक्शन सोसायटी (कॅप्स) अकोला यांच्यासाेबत करारनामा करण्यात आला. अशा श्वानांना पकडण्याच्या माेहिमेला मंगळवारपासून रामदासपेठ भागात प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुमारे १५ श्वान पकडण्यात आले आहेत.
या ठिकाणी हाेणार शस्त्रक्रिया
हाेमगार्ड कार्यालयाजवळील मनपा शाळा क्रं.२ येथे तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत श्वानांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी ॲन्टि रॅबिज लस देण्यात येईल. या ठिकाणी श्वानांना दाेन दिवस चमूच्या देखरेखीखाली ठेवून त्यांना ज्या ठिकाणाहून आणले पुन्हा त्याच भागात सोडण्यात येईल.