अकाेलेकरांचे जमावबंदीकडे दुर्लक्ष
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून, काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश जारी केल्यानंतरही अकाेलेकर याकडे कानाडाेळा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
चाचणीसाठी पुढाकार घ्या!
अकाेला : वातावरणातील बदलामुळे अकाेलेकरांना सर्दी, खाेकला, अंगदुखी, आदी संसर्गजन्य आजारांनी बेजार करून साेडले आहे. शहरात विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाची लक्षणे व साध्या सर्दीच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
गांधी चाैकातील अतिक्रमकांना हुसकावले!
अकाेला : शहरातील मुख्य रस्त्यांलगत अतिक्रमण थाटल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे. आयुक्त निमा अराेरा यांनी १५ फेब्रुवारीपासून शहरात अतिक्रमण हटाव माेहीम सुरू केली. यादरम्यान, बुधवारी गांधी चाैकात रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमकांना हुसकाविण्याची कारवाइ करण्यात आली. पुन्हा दुकाने थाटल्यास साहित्य जप्त केले जाणार आहे.
नगराेत्थान याेजनेंतर्गत निधी प्राप्त
अकाेला : सुवर्णजयंती नगराेत्थान याेजने अंतर्गत शासनाकडून महापालिकेला साडेचार काेटींचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये मनपाला ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा करावा लागणार असून, एकूण ५ काेटी ८५ लाख रुपयांतून प्रस्तावित कामे निकाली काढली जाणार आहेत. तसे प्रस्ताव नगरसेवकांनी सादर केले असून, मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत.
रस्त्यांची झाडपूस नाही; वाहनधारक त्रस्त
अकाेला : शहरातील प्रमुख रस्त्यांची मनपातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर साफसफाई केली जात असल्याचे चित्र आहे. रस्त्यांची झाडपूस केल्यानंतर जमा झालेली माती ट्रॅक्टरमध्ये जमा न करता दुभाजकांलगत मातीचे ढीग लावले जात असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
टायमर बिघडले; पथदिवे बंद
अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करून एलईडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. हद्दवाढ क्षेत्रातील पथदिव्यांचे टायमर बिघडल्याने पथदिवे रात्री बंद, तर दिवसा सुरू राहत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराकडे मनपाच्या विद्युत विभागासह कंत्राटदाराचे दुर्लक्ष हाेत आहे. या प्रकाराची आयुक्त निमा अराेरा यांनी दखल घेण्याची मागणी हाेत आहे.
मच्छी मार्केटमध्ये अस्वच्छता
अकाेला : माेहम्मद अली चाैक परिसरातील मच्छी मार्केटमध्ये व्यावसायिकांकडून मांसाचे तुकडे उघड्यावर फेकले जातात. मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी नियमित साफसफाई हाेत नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, दुर्गंधी पसरली आहे. या प्रकाराकडे आराेग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष हाेत आहे.