महापालिकेच्या आयुक्तपदी शासनाने ‘आयएएस’ निमा अराेरा यांच्या नियुक्तीचे आदेश ३ फेब्रुवारी राेजी जारी केले हाेते. अराेरा यांनी साेमवारी मनपात दाखल हाेत आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, या वेळी त्यांनी शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. मनपा कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावे याकरिता उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास नवनियुक्त आयुक्त निमा अराेरा यांनी व्यक्त केला.
विभाग प्रमुखांसाेबत साधला संवाद
मनपात दुपारी कामकाज स्वीकारणाऱ्या निमा अराेरा यांनी सायंकाळी ४ वाजता सर्व विभाग प्रमुखांसाेबत संवाद साधला. या वेळी विभाग प्रमुखांनी साेबत आणलेल्या नाेंदवह्या, रजिस्टर आदी साहित्य दालनाबाहेर ठेवण्याचे निर्देश दिले हाेते.
स्वच्छतेसाठी फाैजफाटा तरीही...
शहरातील साफसफाईच्या कामासाठी मनपाकडे माेठा फाैजफाटा आहे. आस्थापनेवर ७४२ सफाई कर्मचारी असून पडीक प्रभागासाठी ५२२ खासगी सफाई कर्मचारी आहेत. तरीही आज राेजी शहराच्या कानाकाेपऱ्यात घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्या, गटारे दिसत असून सांडपाण्याची समस्या जैसे थे असल्याने सर्वसामान्य अकाेलेकरांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.
१३६ काेटींचा कर कसा वसूल करणार?
मनपाच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे अकाेलेकरांकडे तब्बल १३६ काेटी रुपये थकीत आहेत. मालमत्ता करवाढीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून ३१ मार्चपर्यंत ही रक्कम वसूल न केल्यास नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार पुढील आर्थिक वर्षात सुधारित दरानुसार टॅक्सच्या रकमेची वसुली करावी लागणार आहे. यातून नवनियुक्त आयुक्त निमा अराेरा कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रसिद्धी नकाे, कामाला प्राधान्य!
सर्वसामान्य नागरिकांची कामे निकाली काढणे व प्रशासकीय कामकाजात गती आणण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे आयुक्त निमा अराेरा यांनी स्पष्ट केले. अशी कामे करताना प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणे याेग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.