शहरात अवघ्या दाेन महिन्यांच्या कालावधीत काेराेनाचा तीव्र गतीने प्रसार झाला असून, प्रादुर्भाव वाढल्यामुळे काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. काेराेनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले असले, तरी काेराेना बाधितांचा आकडा पाहता, प्रशासकीय यंत्रणा हतबल ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या दरम्यान, शासनाने लसीकरण माेहीम सुरू केली असून, एकीकडे काेराेना बाधितांचा शाेध घेउन त्यांना उपचारासाठी बाध्य करणे आणि दुसरीकडे चाचणी व लसीकरणासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्याची दुहेरी जबाबदारी महापालिकेला पार पाडावी लागत आहे. अर्थात, काेराेना बाधित रुग्णांची नाेंद ठेवणे, त्यांच्या घरी आकस्मिक भेट देऊन रुग्ण घरी असल्याची खात्री करणे, नसल्यास कारवाई करणे, परिसरात निर्जंतुकीकरण झाले किंवा नाही, याची खातरजमा करणे, चाचणी केंद्रांमध्ये दरराेज ४०० चाचण्यांचे उद्दिष्ट असल्याने गर्दीच्या ठिकाणी व मनपा शाळेच्या आवारात चाचणी केंद्र सुरू करणे, चाचण्यांची दैनंदिन माहिती मनपा आयुक्तांकडे सादर करणे, सायंकाळी ७ नंतर दुकाने उघडी असल्यास, त्यांच्याविराेधात कारवाई करणे आदी अनेक महत्त्वाच्या जबाबदारी झाेन अधिकाऱ्यांकडे साेपविण्यात आल्या आहेत. साहजिकच, झाेन अधिकारी त्यांच्या अधिनस्थ आराेग्य निरीक्षक व इतर कर्मचाऱ्यांकडे जबाबदारीचे वाटप करीत असले, तरी अधिनस्थ कर्मचारी नानाविध पळवाटा शाेधून कर्तव्यात कसूर करीत असल्याची माहिती समाेर येत आहे. याचा परिणाम झाेन अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर हाेत असून, काही अधिकारी तणावात असल्याची माहिती आहे.
आराेग्य निरीक्षकांकडून टाेलवाटाेलवी
ज्या भागात काेराेना बाधित रूग्ण आढळून येत असतील, त्या परिसरात फेरफटका मारून त्यांच्यावर लक्ष ठेवणे, मेडिकल स्टाेअर्समधून औषधी खरेदी करणाऱ्या रुग्णांची माहिती जमा करणे, तसेच खासगी रुग्णालयांमधून रुग्णांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी आराेग्य निरीक्षकांवर साेपविली आहे. सर्वच झाेनमधील बहुतांश आराेग्य निरीक्षक कर्तव्य न बजावता, झाेन अधिकाऱ्यांना टाेलवाटाेलवी करीत असल्याची माहिती आहे.