अकोला : मोर्णा नदीपात्रात वाढलेली जलकुंभी व तुंबलेल्या सांडपाण्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. नदी काठावरील स्थानिक रहिवाशांना विविध आजारांनी ग्रासल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी भाजपाचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेविका जान्हवी डोंगरे यांनी पुढाकार घेत सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. वातावरणातील बदलामुळे शहरात ‘व्हायरल फिवर’ची साथ पसरली आहे. यात भरीस भर मोर्णा नदीच्या पात्रातील जलकुंभीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्येत अधिकच भर पडली आहे. प्रभाग क्रमांक १२ अंतर्गत येणार्या मोर्णा नदी काठावरील अनिकट परिसर, कमला नेहरू नगर भागातील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे हातपाय सुजणे, ताप येणे, खोकला, सर्दी, अंगदुखी अशा आजारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच भाजपाचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेविका जान्हवी डोंगरे यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या मदतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. कमलानगर येथील व्यायाम शाळेत आयोजित शिबिरात असंख्य लोकांनी सहभाग नोंदविला. मनपाच्यावतीने त्यांना औषधीचे वितरण करण्यात आले.
आरोग्य विभाग करतो तरी काय? प्रभाग १२ अंतर्गत अनिकट भागातील नागरिक आजारामुळे हैराण झाल्याचे समजताच भाजपाच्या नगरसेवकांनी पुढाकार घेत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. तत्पूर्वी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने या परिसराची पाहणी केली असता, नागरिक आजारी असल्याचे समोर आले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असताना हा विभाग एरव्ही कोणते कर्तव्य बजावतो, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.