अकोला : वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे सुरू करण्यात आलेल्या जिनिंग फॅक्टरीमध्ये कापसाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र कापूस पणन महासंघाच्या व्यवस्थापकास जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
तक्रारकर्ते राजेंद्र पुंडलिक राऊत यांनी मानोरा येथे गुरुओम जीनिंग फॅक्टरी ६ जानेवारी २००५ रोजी सुरू केली होती; मात्र इतर जिनिंग फॅक्टरीच्या तुलनेत त्यांच्या जिनिग फॅक्टरीमध्ये कापसाचा कमी पुरवठा होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे राऊत यांनी महाराष्ट्र कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापक मगनलाल नामदेव पाटील यांना कापसाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी विनंती केली. यावरून व्यवस्थापक पाटील याने राजेंद्र राऊत यांना दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली; मात्र राऊत यांना लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ जानेवारी २००५ रोजी व्यवस्थापक मगनलाल पाटील यास दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांच्यावतीने नऊ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी मगनलाल पाटील यास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, तसेच कलम १३ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ॲड. किरण खोत यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बर्डेकर यांनी केला होता. न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून संतोष उंबरकर यांनी कामकाज पाहिले.