अकोला : जलयुक्त शिवार योजनेतून बार्शीटाकळी तालुक्यातील मोझरी बुद्रूक येथे केलेल्या सिमेंट नाला बांधाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून, त्याच्या नोंदी मोजमाप पुस्तिकेत घेत देयक अदा करण्यात आले. याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यासोबतच पिंजर गटातील सर्वच कामांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.मोझरी बुद्रूक येथे जलयुक्त शिवार अभियानातून सिमेंट नाला बांधाचे काम करण्यात आले. त्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. त्यामध्ये नाल्याच्या खोलीकरणाची लांबी २८२ मीटर असताना ती मोजमाप पुस्तिकेत ३३० मीटर दाखविण्यात आली. सरासरी खोली ४.५ मीटर असल्याची नोंद आहे, प्रत्यक्षात ती खोली दोन मीटरच आहे. मोजमाप पुस्तिकेत १० एमएम लोखंडी सळ्यांचा वापर केल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात ६ आणि ८ एमएमच्या सळ्यांचाच वापर झाला आहे. हार्ड मुरुमाऐवजी सॉफ्ट मुरूम वापरला. तसेच हार्ड मुरूम खोदकामाची नोंदही घेण्यात आली. त्या दरानुसार देयक काढण्यात आले. याप्रकरणी बार्शीटाकळी लघुसिंचन उपविभागातील शाखा अभियंता लतिका सदापुरे यांनी कामाचे मोजमाप केले आहे. त्यांची चौकशी करून दोषी आढळणाºया सर्वांवर कारवाई करा, सोबतच पिंजर गटातील जलयुक्त शिवार अभियानातून केलेल्या कामांची तपासणी करण्याची मागणीही लहाने यांनी निवेदनात केली. त्यानुसार चौकशी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी सांगितले आहे.