अकोला:शहरातील सिमेंट रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आल्यानंतरही सत्ताधारी भाजपकडून दोषी अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटदारावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी महापौर मदन भरगड यांच्या नेतृत्वात मंगळवारी मुख्य पोस्ट आॅफीस समोर सत्ताधाऱ्यांचा पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला. निकृष्ट रस्त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपच्या लोकप्रतिनिधींसह महापौर विजय अग्रवाल यांनी त्वरीत राजीनामे द्यावे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही,तोपर्यंतआंदोलनांचे सत्र कायम ठेवण्याचा इशारा भरगड यांनी यावेळी दिला.शहरातील सिमेंट रस्ते कामांच्या सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षणाचा (सोशल आॅडिट) अहवाल जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जाहीर केला आहे. दोषी अधिकारी,अभियंते व कंत्राटदारावर आम्हीच कारवाई करणार असल्याची गर्जना करणाºया महापौर विजय अग्रवाल यांनी अहवाल उघड झाल्यापासून आजपर्यंत काय केले, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. निकृष्ट सिमेंट रस्त्यांमध्ये मुख्य पोस्ट आॅफिस ते सिव्हिल लाइन चौक, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, माळीपुरा ते मोहता मिल, अशोक वाटिका ते सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत तसेच नेहरू पार्क चौक ते महापारेषण कार्यालय तसेच सरकारी बगिचा ते सार्वजनिक बांधकाम विभागपर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. सिमेंट रस्ते अतिशय दर्जाहीन असल्याचे समोर आल्यानंतर संबंधितांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घातल्या जात असल्याप्रकरणी काँग्रेसने सत्ताधारी भाजपचा पुतळा जाळला. या आंदोलनात माजी महापौर मदन भरगड , मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, नगरसेवक डॉ. झिशान हुसेन,पराग कांबळे, कपिल रावदेव, अर्जुन थानवी, रूपचंद अग्रवाल, मो. इरफान, मोईन खान उर्फ मोंन्टू, जमीर बरतनवाले, महेश गणगणे, आसिफ खान मकसुद खान, अफरोज लोधी, रफीक लाखानी, गणेश कटारे, राजेंद्र चितलांगे, निखिलेश दिवेकर, विजय शर्मा, सुरेश शर्मा, देविदास सोनोने, अभिषेक भरगड, अनंत बगाडे, मनिष नारायणे, समीरभाई, शेख मुझफ्फर, भगवान बोयत आदी सहभागी होते.