लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाने मृत्यू झाला की नातेवाईक आणि मृत व्यक्तीमध्ये दरीच निर्माण होते. कुटुंबीयांना दुरूनच मृतकाला निरोप द्यावा लागतो, अशावेळी जीवावर उदार होऊन रुग्णालयातील काही कर्मचारी मृतदेह हाताळण्याचे काम करत आहेत. यासाठी त्यांना चांगलं मानधन मिळत असेल, असे अनेकांना वाटत असेल, मात्र हे कर्मचारी केवळ ३५० रुपये रोजंदारीवर काम करत आहेत. त्यातही या रोजंदारी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेळेवर मानधनही मिळत नसल्याचे वास्तव आहे. सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू होणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. या रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह पॅक करून अंत्यविधीसाठी वॉर्डातून शवविच्छेदनगृहात पाठविण्याचे काम हे कर्मचारी करतात. रोजंदारीवर असलेल्या या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे कंत्राट देण्यात आले आहे. अगदी दिवस-रात्र २४ तास या कामासाठी रोजंदारीवरील हे कंत्राटी कर्मचारी दक्ष असतात. मृतदेह वॉर्डातून शवविच्छेदनगृहात लवकरात लवकर हलविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. हे काम करताना कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाची हाताळणी करावी लागते. त्यामुळे सर्वाधिक खबरदारी या कर्मचाऱ्यांना घ्यावी लागते. पीपीई किट, मास्क, हातमोजे यांचा योग्यप्रकारे वापर करण्यावर भर दिला जातो. घरी गेल्यावर लहान मुले, ज्येष्ठांपासून सध्या थोडे दूर राहण्यालाच प्राधान्य देत असल्याचे काहींनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीने भरलेली पदे
८०
दिवसाला रोजगार
३५०
कंत्राट ३ महिन्यांचे
पोट भरेल एवढेच पैसे, शासनाने आमच्याकडेही पाहावे
मृतदेह पॅक करण्याचे काम करताना पैशांचा कधीही विचार केला नाही. कोरोनासारख्या महामारीत काम मिळाले, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
या कामामुळे महिन्याला किमान नऊ हजार रुपये मिळतात. पोट भरण्यापुरते हे पैसे आहेत, पण त्यापेक्षा आपल्याला या क्षेत्रात काम करता येत आहे, हे अधिक महत्त्वाचे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे काम करण्यासाठी कोणीही सहज पुढे येत नाही, पण आम्ही हे काम करत आहोत. सुरुवातीला भीती वाटत होती, आता नाही. शासनाने आमच्याकडेही पाहावे, अशी अपेक्षाही यावेळी या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
वेतन अधिक मिळावे, ही कोणत्याही क्षेत्रातील कर्मचाऱ्याची इच्छा असते, मात्र हे काम नाही, तर एक जबाबदारी आहे. एकप्रकारे ही रुग्णसेवा असल्याचे या कर्मचाऱ्यांचे मत आहे.
काय असते काम?
कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्या रुग्णाचा मृतदेह वॉर्डातून शवागृहात आणला जातो. शवागृहातून मनपातर्फे मृतदेह अंत्यविधीसाठी नेला जातो.
वॉर्डातून मृतदेह आणण्यापूर्वी वॉर्डातच मृतदेह एका विशिष्ट पॅकिंग बॅगमध्ये बंदिस्त केला जातो. हे काम कंत्राटी तत्वावर नेमलेले कर्मचारी करतात. मृतदेह पॅक करुन तेच कर्मचारी मृतदेह शवागृहात नेतात.
मृतदेहांचे पॅकिंग आणि शिफ्टिंग, कामाचे मोल ओळखावे
महिन्याला मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. आजपर्यंत कधी वेतनाचा विचार केला नाही. माणुसकी म्हणूनच हे काम करतो. माझ्याकडून रुग्णसेवा होत आहे, याचा आनंदच. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊनच काम करतो.
- विरेंद्र मिश्रा
हे देखील एकप्रकारे रुग्णसेवेचेच काम आहे. कोरोना संकटाच्या काळात आम्हाला रुग्णसेवेची संधी मिळाली, हे महत्त्वाचे. प्रशासनाने आमच्यासह आमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- आशिष भादुर्गे
सर्वोपचार रुग्णालयात कंत्राटी तत्वावर रोजगार मिळाला. त्यापेक्षा जास्त आनंद रुग्णसेवेचा आहे. सर्वच कंत्राटी सहकारी त्यांची जबाबदारी पार पाडतात, मात्र मानधन वेळेवर मिळत नसल्याने कुटुंबाचा गाडा चालवणे कठीण झाले आहे.
- मंगेश लापुरकार