- संतोष येलकर
अकोला : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात विकासकामांसाठी ९४५ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर असला तरी, ३ सप्टेंबरपर्यंत पाचही जिल्ह्यात विकास कामांवर ११२ कोटी ३ लाख रुपयांचा (११.८५ टक्के) निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित ८३३ कोटी १९ लाख रुपयांचा निधी केव्हा खर्च होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात विविध विकासकामांसाठी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यात ९४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधी जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण ) योजनेंतर्गत कृषी व संलग्न सेवा, ग्राम विकास, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे व पूर नियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवा आणि नावीन्यपूर्ण योजना, बळकटीकरण व मूल्यमापन इत्यादी क्षेत्रातील विविध विकासकामांवर येत्या ३१ मार्चपर्यंत खर्च करावयाचा आहे; परंतु ९४५ कोटी २२ लाख रुपयांच्या मंजूर निधीपैकी गत एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत केवळ ११२ कोटी ३ लाख रुपयांचा निधी (११.८५ टक्के ) विकास कामांवर खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे विभागातील पाचही जिल्ह्यातील विकास कामांचा उर्वरित ८३३ कोटी १९ लाख रुपयांचा निधी येत्या सात महिन्यात संबंधित यंत्रणांमार्फत खर्च होणार की नाही आणि उपलब्ध निधीतून विकासकामे मार्गी लागणार की नाही, याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील विकास कामांसाठी ९४५ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ३ सप्टेंबरपर्यंत ११२ कोटी ३ लाख रुपये (११.८५ टक्के )निधी खर्च झाला असून, उर्वरित निधी खर्च तातडीने खर्च करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.-धनंजय सुटेउपायुक्त (नियोजन),अमरावती विभाग.