अकाेला : कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. अकाेल्यात सध्या या आजाराच्या २३ रुग्णांची नाेंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली आहे. एकीकडे या आजाराचे संकट असतानाच खर्चाचे नवीन संकट उभे ठाकले आहे. शासनाने महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेत या आजाराला समाविष्ट केले असून १ लाख ५० हजार, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत ५ लाख रुपये निश्चित केले आहेत. परंतु या आजारात विविध विषयांतील विशेषज्ञ, औषधोपचार, शस्त्रक्रिया व रुग्णालयातील वास्तव्याचा खर्चच किमान ८ लाखांवर जात असल्याने शासनाची ही मदत तोकडी पडत आहे. यामुळे जनआरोग्य योजनेत असलेल्या खासगी रुग्णालयांच्या अडचणी वाढल्या आहेत.
खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांवर पडू नये यासाठी योजनेत समाविष्ट खासगी रुग्णालयांना महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेतून दीड लाखांचे दहा दिवसांचे ‘पॅकेज’ दिले आहे. परंतु बहुआयामी विशेषज्ञांच्या सेवांची पडत असलेली गरज, शस्त्रक्रिया, महागडी औषधी व रुग्णालयातील वास्तव्य आदींचा खर्चच एका रुग्णाला ८ ते १० लाख रुपये येत असताना दीड लाखात हा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न खासगी रुग्णालयांना पडला आहे.
याेजनेतून खर्चच नाही
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मायक्रोबायलॉजिस्ट, इंटर्नल मेडिसीन स्पेशालिस्ट, इन्टेन्सिव्हिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, ईएनटी स्पेशालिस्ट, ऑप्थेल्मोलॉजिस्ट, डेंटिस्ट, मॅक्सिलोफेशिअल किंवा प्लॅस्टिक सर्जन व बायोकेमिस्ट अशा विशेषज्ञांच्या सेवांची गरज पडते. यांच्याशी संबंधित शस्त्रक्रिया केल्या जातात. शिवाय, ‘लिपोसोमल अॅम्फोटीसिरीन-बी’ ‘५० एमजी’च्या एका इंजेक्शनची किंमत बाजारात ७,५०० रुपयांचे आहे. आजाराची गंभीरता पाहून दिवसाला जवळपास दोन ते चार इंजेक्शन दिले जातात. ‘पॉसॅकोनाझोल’ दहा गोळ्यांची किंमत पाच हजारांच्या घरात आहे. या शिवाय, इतरही औषधांचा खर्च आहेच. हा खर्च दीड लाखात बसत नसल्याचे योजनेतील काही रुग्णालयांचे म्हणणे आहे. सध्यातरी एकाही खासगी रुग्णालयात या योजनेतून उपचार होत नाही.
काेराेनामध्ये रेमडेसिविरच्या इंजेक्शनसाठी धावाधाव करावी लागली व आता म्युकरमायकोसिसच्या औषधांसाठी शाेधाशाेध करावी लागते. औषधेही खर्चिक आहेत. आराेग्य याेजनेचा लाभ नाही घेतला.
अनिल खांडके
म्युकरमायकोसिसवरील रोजचा खर्चच जास्त आहे . रेमडेसीवीरसारखे या आजाराचेही इंजेक्शन रुग्णालयातून मिळाले तर रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक थांबेल.
संताेष मुऱ्हेकर