लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तेल्हारा तालुका व शहरात केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या वृक्ष लागवड संकल्प योजनेंतर्गत विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका व पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले; मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने यातील अनेक रोपटे सुकल्याचे चित्र आहे. त्यामुळे वृक्षारोपणानंतर करण्यात आलेला खर्च व्यर्थ गेल्याचे चित्र आहे.या अभियानात मोठ्या थाटामाटात ‘एक घर-एक झाड’, ‘एक मूल-एक झाड’ योजना राबविण्यात आली; परंतु अजिबात पाऊस नसल्याने रोपट्यांची अवस्था मृतप्राय झाली आहे. गेल्या २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी अनेक ठिकाणी वृक्षारोपण पार पडले, तर काहींनी वृक्षारोपण करून स्वत:चा वाढदिवस साजरा केला. वृक्ष संगोपन व संरक्षणाचा संकल्प वाया गेल्याचे दिसून येत आहे. वृक्ष लागवडीनंतर वृक्षांना पाणी देण्याचे सौजन्य कुणी दाखविले नाही. पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची उगवणदेखील अद्याप झालेली दिसत नाही. सर्वदूर पावसाची वाट पाहणे सुरू आहे. (प्रतिनिधी)
वृक्षारोपणावर केलेला खर्च व्यर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 7:21 PM