अकोला: जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत बीटी कपाशी बियाणे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. यंदाच्या हंगामातील कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला असला तरी, ५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील केवळ ८०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बियाणे अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित ८ हजार २०० लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात बियाणे अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अध्याप प्रलंबित असल्याने, जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना बियाणे अनुदान रकमेचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर बीटी कपाशी बियाणे वाटप करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कपाशी बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना बियाणे अनुदानाची रक्कम वाटप केली जात आहे. त्यासाठी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९ हजार लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या कापूस हंगामातील कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला असला तरी, जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बियाणे वाटप योजनेतील बियाणे अनुदानाची रक्कम अद्यापही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. योजनेंतर्गत एकूण लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ४ डिसेंबरपर्यंत केवळ ८०० लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बियाणे अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित ८ हजार २०० लाभार्थी शेतकऱ्यांना अध्यापही बियाणे अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बियाणे अनुदानाची रक्कम केव्हा जमा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१.११ कोटी रुपयांची योजना!
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर बीटी कपाशी बियाणे वाटप करण्यासाठी १ कोटी ११ लाख रुपयांची योजना राबविण्यात येत आहे; मात्र या योजनेत निवड करण्यात आलेल्या शेतकरी लाभार्थींना या योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही.
कपाशी बियाणे वाटप योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ४ डिसेंबरपर्यंत ८०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बियाणे अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली. उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांना आठ दिवसात अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येईल.
-मुरली इंगळे
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद