अकोला: पावसाच्या अनिश्चिततेमुळे सलग दहा वर्षांंपासून सरासरी उत्पादन घटल्याने शेतकर्यांच्या हातात पैसाच शिल्लक नाही. गतवर्षी पुन्हा पावसाने या संकटात भर टाकल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाच्या घोषणेप्रमाणे कापसाला बोनस नाही आणि बाजारात धान्याचे दर कोसळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विदर्भातील कृषिविकासाचा दर गत बारा वर्षांंपासून कमीच आहे. पुन्हा नैसर्गिक आपत्ती, भूमी अधिग्रहण आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरामुळे या विकासदरात घसरणच सुरू असल्याने विदर्भातील शेतकरी खचला आहे. मागील दहा वर्षांंतील कृषिविकासाचा दर कमी-अधिक या स्वरू पात असल्याचा निष्कर्ष आहे. त्याचे गंभीर परिणाम विदर्भातील शेतकर्यांना सोसावे लागत आहेत. गत पाच वर्षांंत तर शेतकर्यांच्या परिस्थितीत तसूभरही सुधारणा झाली नसून, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. शेतकर्यांना नफ्याऐवजी तोटाच झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. यावर्षी तर सोयाबीन आणि कापसाचे हेक्टरी उत्पादन घटले आहे. शेतकर्यांच्या हातात पैसाच शिल्लक नसून, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न या सर्वांंमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यावर्षी मशागतीची कामाची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. शेताला उन्ह मिळावे म्हणून विदर्भातील शेतकरी मार्च महिन्यापासून शेतीच्या मशागतीला सुरुवात करतो; परंतु पैसा हातात नसल्याने शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करण्याच्या मागे लागला आहे. तथापि, पैसा देण्यास सहज कोणी तयार होत नसल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे.
कापसाला बोनस नाही, बाजारात धान्याचे दर घसरलेलेच!
By admin | Published: February 10, 2016 2:19 AM