- राजरत्न सिरसाट
अकोला: मान्सूनपूर्व कापूस बाजारात आला असून, प्रतवारीनुसार सध्या या कापसाला राज्यात प्रतिक्विंटल ५,५०० ते ६,१०० रुपये दर आहेत. यावर्षी कापसाचे पीक उत्तम असल्याने क्षेत्र कमी असूनही उत्पादन वाढणार आहे; पण चीनने भारताकडून होणारी कापसाची आयात रद्द केल्याने भविष्यात दर घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत तज्ज्ञांमध्ये मात्र मतभिन्नता आहे.यावर्षी देशात १२२ लाख हेक्टरवर कापसाचे क्षेत्र असून, राज्यात ४१.१८ लाख आहे, तर हेच क्षेत्र विदर्भात १५.२३ लाख एवढे आहे. यावर्षी पीक उत्तम आहे. राज्यातील कापूस पट्ट्यात परतीच्या पाऊस झाल्याने कपाशी पीक पुन्हा बहरले आहे. त्यामुळे गतवर्षींच्या तुलनेत १० टक्के कपाशीचे क्षेत्र कमी झाले असले तरी उत्पादन भरपूर होण्याची शक्यता आहे. सध्या खान्देश व विदर्भात काही भागात मान्सूनपूर्व कापूस बाजारात आला असून, दरही चांगले मिळत आहेत. केंद्र शासनाने यावर्षी आखूड धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल ५,१५० तर लांब धाग्याच्या कापसाला ५,४५० रुपये इतके हमी दर जाहीर केले आहे. बाजारात सध्या या दरापेक्षा म्हणजेच ५०० ते ६०० रुपये अधिक मिळत आहेत. खान्देशात हे दर ६,१०० रुपये प्रतिक्विंटल तर विदर्भातील अकोट बाजारात प्रतवारीनुसार ५,१००, ५,५८०० ते ६,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर आहेत. कापसाची आवक मात्र सद्या कमी आहे. खरीप हंगामातील कापूस पुढच्या महिन्यापासून बाजारात येईल. हे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे; पण मध्येच चीनने भारतातील कापूस घेण्यास नाकारल्याचे शेतकºयांची चिंता वाढली आहे. तज्ज्ञाच्या मते मात्र चीनमध्ये कापसाचे कमी क्षेत्र असल्याने त्यांना भारतीय कापसाची गरज भासणार आहे. चीननंतर बांगलादेश भारतातील कापसाचा मोठा आयातदार आहे. तसेच इंडोनेशिया, व्हिएतनाम व इतर काही देशात भारतातील कापसाची मागणी असतेच. त्यामुळे यावर्षी शेतकºयांना चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. चीनने कपाशीची आयात नाकारल्याने दर कमी होण्याची शक्यता असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.- चीनने आयात नाकारल्याने याचा कापूस दरावर तात्पुरता परिणाम होईल. चीनमधील कापसाचे क्षेत्र सहा ते सात लाख हेक्टरच असल्याने त्यांना भारतीय कापसाची गरज पडणारच आहे, त्यामुळे भाव वाढतील.- डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.