- राजरत्न सिरसाट
अकोला: देशात आर्थिक मंदीची चाहूल लागताच कापड उद्योगांकडून कापसाची मागणी घटत असल्याचे संकेत असून, यावर्षी याचा १० ते १५ हजार कोटींचा फटका राज्यातील कापूस उत्पादकांना बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.देशात यावर्षी १ कोटी २२ लाख हेक्टर कापसाचे क्षेत्र असून, राज्यात ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर कापूस पेरणी करण्यात आली. मराठवाडा सोडला तर राज्यात १०० टक्के कापसाची पेरणी झाली. देशातील कापसाचे उत्पादन मागच्या वर्षापर्यंत सरासरी ३ कोटी ६० ते ८० लाख गाठी एवढे होत आहे. राज्यात ६० ते ८० लाख गाठीचे उत्पादन होत असते. तथापि, यावर्षी कापसाचे उत्पादन देशात ४ कोटी गाठींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.असे असले तरी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधिारित दर मिळणार नसल्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी जगासह देशात सरकी, ढेपीचे दर प्रतिक्विंटल ३ हजार, २०० रुपयांवर पोहोेचल्याने कापसाला प्रतिक्विंटल ६,५०० रुपये दर मिळाले होेते. तथापि, यावर्षी कापसाचे रुईचे दर अमेरिका व जगाच्या बाजारात घटल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे. सरकी व ढेपीचे दरही प्रतिक्विंटल २ हजारापेक्षा कमी होण्याचे संकेत आहेत. यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे दर २ हजार रुपयांनी कमी होऊन यावर्षी ६,५०० वरू न हे दर चार ते ४,५०० रुपये क्विंटलच्या खाली येण्याची शक्यता आहे. यावर्षी कापसाचे हमीदर ५,५५० रुपये जाहीर क रण्यात आले. हमीदराप्रमाणे खरेदी लवकर सुरू केली तर तोटा कमी होईल. व्यापाऱ्यांना मात्र यावर्षी कापूस खरेदी करणे कठीण होणार असल्याचे कापूस व्यापारी तज्ज्ञांचे मत आहे.राज्यातील जवळपास सूतगिरणी, जिनिंग-प्रेसिंग बंद असून, एनटीपीसी अंतर्गत कापड गिरण्याही बंद पडल्या आहेत. कापड (गारमेंट) उद्योगात बांगलादेशाने केव्हाच भारताला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे यावर्षी आतापर्यंत देशात ३० लाख गाठी कापूस आयात करण्यात आला. या सर्व पृष्ठभूमीवर देशांतर्गत कापसाची मागणी घटण्याची शक्यता आहे.
- आर्थिक मंदीची चर्चा असताना सरकारने आताच ३० लाख गाठी कापसाची आयात केली. ही आयात आणखी वाढण्याची शक्यता आहे. सरकी, ढेपीचे दर आतापासून कोसळत आहेत. या सर्व परिस्थितीचा राज्यातील कापूस उत्पादकांना यावर्षी १० हजार कोटीवर फटका बसण्याची शक्यता आहे.विजय जावंधिया,शेती तज्ज्ञ.