अकोला : जिल्ह्यात कापूस खरेदी संथ गतीने सुरू असल्याने आतापर्यंत केवळ ७४ ते ७५ हजार क्विंटलच कापसाची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे आणखी ६० टक्क्यांच्यावर कापूस पडून आहे; खरीप हंगाम आणि पावसाळा तोंडावर आल्याने रात्रंदिवस खरेदी करण्याची गरज आहे.अशा परिस्थितीतही कापूस खरेदीचे निकष बदलले नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. जिल्ह्यात जवळपास ३२ हजार शेतकºयांनी नोंदणी केली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने ५,२४३ वर शेतकºयाची नोंदणी केली आहे; पण प्रत्यक्षात आतापर्यंत सरासरी १५ टक्केही कापसाची खरेदी झाली नाही. त्यामुळे शेतकºयांच्या हिताच्या राज्य सरकारच्या धोरणाच्या अंमलबजावणीत टाळाटाळ का होत असल्याचा आरोप होत आहे. सीसीआय, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. या दोन्ही मुख्य खरेदीदारांनी जिनिंगला कापूस खरेदीची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिनिंगवर किमान २५ ते ३० गाड्या कापूस उतरवून घेतल्या जात होता. आता केवळ दहाच कापसाची वाहने कापूस खरेदी केला जात आहे. अकोला जिल्ह्यात जवळपास ५० ते ६० टक्के कापूस शेतकºयांकडे आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ५ हजार २४३ कापूस उत्पादक शेतकºयांनी कापूस विकण्यासाठी नोंदणी केली आहे; पण येथे दररोज २० गाड्यांमधील कापूस खरेदी केल्यास खरेदीला खूप दिवस लागतील. सध्या शेतकºयांच्या हातात पैसा आला, तरच पुढची कामे सुरू होतील. या पृष्ठभूमीवर पणन, सीसीआय आणि जिनिंगमध्ये रात्रंदिवस कापूस खरेदीची सुरुवात करावी, अशी मागणी आहे. निकष बदला!पणन महासंघाची राज्यात १४१ जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरू आहे. सीसीआयचीदेखील आहे; पण खरेदीचे निकष बदलणे गरजेचे आहे. अकोला जिल्ह्यात मोजकेच जिनिंग कापूस खरेदी करीत आहेत. हे जिनिंग कापूस खरेदी करण्यास तयार आहेत; पण त्यातही निकष लावल्याने कापूस विकावा की नाही, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.